नाशिक : सेवानिवृत्तास सुमारे दोन लाखांचा ऑनलाइन गंडा | पुढारी

नाशिक : सेवानिवृत्तास सुमारे दोन लाखांचा ऑनलाइन गंडा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
बँक खाते बंद करण्याची भीती दाखवून भामट्याने सेवानिवृत्त व्यक्तीस ऑनलाइन पद्धतीने गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. भामट्याने पुणे येथील रहिवासी विजयकुमार गोविंदराव ठुबे (62) यांना एक लाख 99 हजार 342 रुपयांचा गंडा घातला आहे.

ठुबे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, भामट्याने 11 सप्टेंबरला सकाळी 10.30 ते दुपारी 12.30 दरम्यान गंडा घातला. भामट्याने ठुबे यांना फोन व मेसेज करून बँक खात्यास पॅनकार्ड अपडेट केले नाही तर खाते ब्लॉक होईल, अशी भीती घातली. खाते ब्लॉक होऊ द्यायचे नसल्यास ठुबे यांना मेसेजमध्ये दिलेल्या लिंकवर माहिती भरण्यास सांगितले. त्यानुसार ठुबे यांनी लिंकवरील माहिती भरली. त्यात बँक खात्याशी संबंधित सर्व गोपनीय माहिती होती. त्यानंतर भामट्याने ठुबे यांच्याकडून ओटीपी प्राप्त करून ऑनलाइन पद्धतीने सुमारे दोन लाख रुपये दुसर्‍या बँक खात्यात वर्ग केले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर ठुबे यांनी मंगळवारी (दि.13) सायबर पोलिसांकडे धाव घेत भामट्याविरोधात तक्रार केली आहे. त्यानुसार सायबर पोलिसांनी अज्ञात मोबाइलधारकासह फसवणुकीची रक्कम वर्ग झालेल्या खातेधारकाविरुद्ध तसेच या बँकेविरुद्ध सायबर गुन्ह्याची नोंद केली आहे. या प्रकरणी वरिष्ठ पोलिस निरीक्षक सूरज बिजली तपास करीत आहेत.

सायबर पोलिसांना तपासात अडथळे
ठुबे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, एचडीएफसी बँकेतून त्यांचा संपर्क क्रमांक व बँक खात्याची माहिती भामट्यांना मिळाल्याचा आरोप आहे. त्यामुळे बँकेविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, भामट्याने ठुबे यांच्या बँक खात्यातील केलेल्या व्यवहारांची माहिती घटना घडल्यानंतर बुधवारी (दि.14) दुपारपर्यंत बँकेकडून दिली नसल्याने सायबर पोलिसांना तपासात अडथळे येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा :

Back to top button