पुणे : वेळेवर कर्जफेड केल्यास ‘सहकार’ला बळकटी: सहकार आयुक्त अनिल कवडे यांचा विश्वास | पुढारी

पुणे : वेळेवर कर्जफेड केल्यास ‘सहकार’ला बळकटी: सहकार आयुक्त अनिल कवडे यांचा विश्वास

पुणे; पुढारी वृत्तसेवा: ‘माझ्या अडचणीत मला पतसंस्थेने मदत केली असून, त्या कर्जाची वेळेवर परतफेड करून मी पतसंस्थेला मदत केली पाहिजे, अशी भावना सभासदांमध्ये रुजविण्याचे काम पतसंस्थांनी केले पाहिजे,’ असे मत सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी व्यक्त केले. पतसंस्था सभासदांनी वेळेवर कर्ज परतफेड करून त्यानुसार योगदान दिल्यास सहकार चळवळ नक्कीच बळकटी येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था (पुणे शहर) व जिल्हा उपनिबंधक, (पुणे ग्रामीण) आणि पुणे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या संयुक्त विद्यमाने पुणे जिल्ह्यातील नागरी व ग्रामीण सहकारी पतसंस्थांसाठीची एकदिवसीय कार्यशाळा बुधवारी (दि.14) जिल्हा बँकेच्या सभागृहात झाली. त्या वेळी अध्यक्षस्थानावरून आयुक्त बोलत होते. या वेळी पुणे विभागीय सहनिबंधक डॉ. संजयकुमार भोसले, सहकारी संस्थांचे विभागीय उपनिबंधक दिग्विजय आहेर, जिल्हा उपनिबंधक (शहर) नारायण आघाव, जिल्हा उपनिबंधक (ग्रामीण) मिलिंद सोबले, शहाजी रानवडे व अन्य पदाधिकारी, सहकार विभागाचे अन्य अधिकारी उपस्थित होते.

पतसंस्थांना नव्याने लागू झालेले कलम 144-अ ते 144-वाय यासंदर्भात जिल्हा उपनिबंधक (ग्रामीण) मिलिंद सोबले, पतसंस्था संदर्भातील आर्थिक साक्षरता या विषयावर पुणे विभागाचे विशेष लेखापरीक्षक वर्ग-1 बाळासाहेब बडाख, तर थकबाकी वसुलीमधील कायदेशीर बाबींवर सहकार विभागाचे उपनिबंधक व पुणे बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांनी सादरीकरण करीत मार्गदर्शन केले आणि उपस्थितांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. पुणे विभागीय सहनिबंधक डॉ. संजयकुमार भोसले व जिल्हा उपनिबंधक नारायण आघाव यांनीही कार्यशाळेस मार्गदर्शन केले. स्वागत नितीन पाटील यांनी केले. पतसंस्था फेडरेशनचे संचालक यतीनकुमार हुले यांनी सूत्रसंचालन केले. फेडरेशनचे उपाध्यक्ष विनायकराव तांबे यांनी प्रास्तविक केले. फेडरेशनचे सचिव शहाजी रानवडे यांनी आभार मानले.

Back to top button