वीरमधून निरेत मोठा विसर्ग; 31 टीएमसी पाणी सोडल्याने नदी दुथडी भरून वाहू लागली | पुढारी

वीरमधून निरेत मोठा विसर्ग; 31 टीएमसी पाणी सोडल्याने नदी दुथडी भरून वाहू लागली

निरा; पुढारी वृत्तसेवा: गेल्या पाच-सहा दिवसांत निरा खोर्‍यातील धरणांच्या परिसरात दमदार पाऊस झाल्याने वीर धरणाच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाली. मंगळवारी (दि. 13) रात्रीपासून वीर धरणातून 15 हजार 911 क्युसेकने विसर्ग निरा नदीत सोडण्यात आलाा. त्यामुळे निरा नदी दुथडी वाहू लागली आहे. या हंगामात वीर धरणातून निरा नदीत सुमारे 31 टीएमसी पाणी सोडले गेले आहे.

या वर्षी निरा देवघर, भाटघर, गुंजवणी व वीर या धरण परिसरात समाधानकारक पाऊस झाल्याने ही चारही धरणे गेेेेल्या महिन्यांतच 100 टक्के भरली आहेत. निरा खोर्‍यातील या चारही धरणांच्या परिसरात गेल्या पाच – सहा दिवसांत काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला, तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडल्याने निरा देवघर, भाटघर, गुंजवणी धरणातील पाण्याचा विसर्ग वीर धरणात येऊ लागला आहे. या पाण्यामुळे वीर धरणाच्या पाणी पातळीत चांगलीच वाढ झाली.

हवामान खात्याने दिलेल्या इशार्‍यानुसार मंगळवारी (दि.13) रात्री सव्वादहा वाजता वीर धरणातून 13 हजार 911 क्युसेक व धरणाच्या निरा उजवा कालवा विद्युतगृहातून 1 हजार 100 क्युसेक, निरा डावा कालवा विद्युतगृहातून 900 क्युसेक असा 15 हजार 911 क्युसेकने विसर्ग निरा नदीत सुरू करण्यात आला. निरा नदीच्या तीरावरील दत्तघाटाच्या पायर्‍या पाण्याखाली गेल्या असून, दत्तमंदिराला पाणी लागले आहे.

बुधवारी ( दि.14) संध्याकाळी चार वाजता भाटघर धरणातून 3 हजार 500 क्युसेकने, निरा देवघर धरणातून 700 क्युसेकने, गुंजवणी धरणातून 1 हजार 780 क्युसेकने विसर्ग सुरू होता. हा विसर्ग वीर धरणात आला. दरम्यान, वीर धरण प्रशासनाने निरा नदीकाठच्या रहिवाशांना सावधगिरीचा इशारा दिला आहे.

बुधवारी संध्याकाळी चार वाजताची स्थिती
निरा देवघर धरणात 11.729 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात या हंगामात आजपर्यंत 2169 मि.मी.पावसाची नोंद झाली. भाटघर धरणात 23.502 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 903 मि.मी.पावसाची नोंद झाली. वीर धरणात 9.408 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 539 मि.मी.पावसाची नोंद झाली. गुंजवणी धरणात 3.690 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 2352 मि.मी.पावसाची नोंद झाली.

Back to top button