नाशिक : मास्टर मॉलच्या संचालकांविरोधात गुन्हा | पुढारी

नाशिक : मास्टर मॉलच्या संचालकांविरोधात गुन्हा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महापालिकेच्या नगर रचना विभागाकडून मास्टर मॉलच्या दोन संचालकांविरुद्ध बांधकाम परवानगीमधील अटी-शर्तींचे उल्लंघन करत मास्टर मॉलचे अवैध बांधकाम केल्याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आली आहे. या फिर्यादीनुसार नगर रचना अधिनियमांतर्गत व्यावसायिक संशयित राजू मोटवानी, श्याम मोटवानी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गंजमाळ येथील मास्टर मॉलच्या इमारतीस रविवारी (दि.19) सायंकाळच्या सुमारास भीषण आग लागली होती. अवैध बांधकाम असल्याने अग्निशमन दलास आग विझवण्यासाठी अनेक अडचणी आल्या. अखेर इमारतीच्या दर्शनी भागातील भिंत पाडल्यानंतर आगीवर सुमारे 47 तासांनंतर नियंत्रण मिळवण्यात आले होते. आगीत इमारतीसह इमारतीतील ठेवलेल्या मालाचे अंदाजे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. मॉलच्या इमारतीमध्ये कुठल्याही प्रकारची अग्निप्रतिरोधक यंत्रणा बसविलेली नव्हती.

मॉलच्या भिंतींना खिडक्या व एक्झॉस्टसाठी व्हेंटिलेशन व्यवस्थाही करण्यात आलेली नव्हती. त्याचप्रमाणे आपत्कालीन परिस्थितीत बाहेर पडण्यासाठी पर्यायी मार्ग नसल्याचे आढळून आले. मॉलच्या इमारतीवरील भाग व्यावसायिक वापरासाठी बंदिस्त केल्याचे आढळून आले. त्यामुळे आग विझविण्यासाठी मॉलवर जेसीबी चालविण्याचा एकमेव पर्याय शिल्लक राहिला होता.

महापालिकेच्या पाहणीत मॉलच्या संचालकांनी परवानगी घेताना सादर केलेला बांधकामाचा नकाशा व प्रत्यक्षात बांधलेल्या इमारतीमध्ये मोठा बदल झाला असल्याचे आढळून आले आहे. तसेच रहिवासी वापराकरिता दिलेल्या परवानगीचे उल्लंघन करत व्यावसायिक वापर करण्यात येत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

अधिनियम 1983 चे उल्लंघन केल्याचा ठपका
संबंधितांनी महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम 1983 चे उल्लंघन केल्याचा ठपका नगर रचना विभागाने ठेवला आहे. मोटवानी बंधूंवर नगर रचना विभागातील सहायक कनिष्ठ अभियंता प्रदीप बळवंत भामरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आल्याचे भद्रकाली पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा :

Back to top button