पहिल्याच दिवशी हडपसर-गुवाहाटी विशेष रेल्वेचा फज्जा! ऐनवेळी प्रवाशांची धावपळ | पुढारी

पहिल्याच दिवशी हडपसर-गुवाहाटी विशेष रेल्वेचा फज्जा! ऐनवेळी प्रवाशांची धावपळ

पुणे : पुढारी वृत्तसेवा : हडपसर टर्मिनलवरून सोडण्यात येणारी ‘हडपसर- गुवाहाटी’ पहिलीच विशेष रेल्वे (ट्रेन क्र. 05609) गुरुवारी (दि.9) तब्बल 10 तास उशिराने सुटली. त्यामुळे प्रवाशांना प्रचंड मानसिक त्रास झाला अन् त्यांची चांगलीच धावपळ उडाली. पुणे परिसरातून आलेल्या काही नागरिकांना येथे रेल्वेची चक्क 10 तास वाट पाहत हडपसर टर्मिनलवर बसून राहावे लागले. यावरून रेल्वेचा ढिसाळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे.

पुणे रेल्वे स्थानकावरील अतिरिक्त बोजा कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने हडपसरमध्ये टर्मिनल उभारले आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासन आता हडपसर टर्मिनलवरून गाड्यांची संख्या वाढवत आहे. त्यानुसार ’हडपसर- गुवाहाटी’ विशेष गाडीच्या एकूण 16 फेर्‍या येथून होणार आहेत. यातीलच गुरुवारी (दि.9) प्रवाशांच्या सोयीसाठी विशेष गाडी हडपसरमधून सुरू होणार होती. मात्र, विशेष गाडीच्या पहिल्या फेरीलाच ग्रहण लागले अन् प्रवाशांना तब्बल दहा तास उशिरा प्रवास सुरू करावा लागला.

हडपसर- गुवाहाटी गाडी पूर्व सीमांत रेल्वेची आहे. गुवाहाटीवरून हडपसर येथे रॅक (डबा) येण्यास जवळपास 16 तास लागले. त्यामुळे हडपसरवरून गुवाहाटीला जाणार्‍या रेल्वे गाडीला 10 तास उशीर झाला आहे. प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत.
– रामपाल बडपग्गा, जनसंपर्क अधिकारी,
मध्य रेल्वे, पुणे विभाग

…असा उडाला विशेष रेल्वेचा गोंधळ

हडपसर-गुवाहाटी विशेष गाडीची पहिली फेरी गुरुवारी सकाळी 10 वाजता होणार होती. मात्र, रेल्वे प्रशासनाने येथून सकाळी 10 वाजता सुटणार्‍या गाडीच्या वेळेत अचानक बदल केला अन् गाडी गुरुवारीच दुपारी 3.30 वाजता सुटणार असल्याचे सांगितले. त्यामुळे सकाळी आलेल्या प्रवाशांना सुरुवातीला दुपारी 3.30 वाजेपर्यंत हडपसर टर्मिनलवर थांबावे लागले. यामुळे प्रवाशांना मानसिक त्रास झाला. त्यातच दुपारचे साडेतीन वाजल्यावर प्रवाशांच्या मानसिक त्रासात आणखी भर पडली. रेल्वे प्रशासनाने ही गाडी गुरुवारीच रात्री 8 वाजता सोडणार असल्याचे सांगितले. त्यामुळे प्रवाशांची चांगलीच धावपळ उडाली. रेल्वेच्या या ढिसाळ कारभाराबद्दल रेल्वे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.

प्रवासी म्हणतात, वेळापत्रकाचे पालन व्हावे

याबाबत प्रवासी म्हणाले, रेल्वे प्रशासनाने अशाप्रकारे आम्हाला न कळवता गाडी 10 तास उशिरा सोडणे चुकीचे आहे. यामुळे आम्हाला प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागला. रेल्वेचा असा ढिसाळ कारभार आमच्यासारख्या प्रवाशांना कायमच सहन करावा लागत आहे. अनेक गाड्या उशिरा धावत आहेत. रेल्वे प्रशासनाने वेळापत्रक करून, योग्य त्या सुधारणा कराव्यात.

हेही वाचा

Back to top button