नाशिक : गौण खनिजाची अवैध वाहतूक करणार्‍या 400 व्यक्तींवर कारवाई | पुढारी

नाशिक : गौण खनिजाची अवैध वाहतूक करणार्‍या 400 व्यक्तींवर कारवाई

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गौण खनिजच्या अवैध वाहतुकीला रोखण्यासाठी वाहनांवर जीपीएस यंत्रणा बसविण्याचे आदेश असतानाही अद्याप जिल्ह्यातील 3,544 पैकी तब्बल 2,231 वाहनांवर जीपीएस यंत्रणाच कार्यान्वित नसल्याचे गौण खनिज विभागाच्या पाहणीत निदर्शनास आले आहे. त्यामुळे अशा वाहनांवर प्रशासनाने कडक भूमिका घ्यायला सुरुवात केली आहे. गौण खनिजाची अवैध वाहतूक करणार्‍या 400 व्यक्तींवर प्रशासनाने कारवाई केली.

जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीचे प्रमाण वाढले आहे. जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी तीन महिन्यांपूर्वी जिल्ह्याची सूत्रे हाती घेतल्यानंतर सर्वप्रथम अवैध गौण खनिजाविरोधात मोहीम हाती घेतली. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व खाणपट्टाधारक, क्रशरचालकांना गौण खनिजाची वाहतूक करणार्‍या वाहनांवर जीपीएस बसवून ती शासनाच्या महा खनिज संगणकीय प्रणालीशी इंटिग्रेट करण्याचे निर्देश तहसीलदारांमार्फत वेळोवेळी देण्यात आले. प्रशासनाकडून जीपीएससाठी दोनदा मुदतवाढदेखील देण्यात आली आहे. मात्र, निर्देश देऊनही जिल्ह्यातील 2,231 वाहनांवर अद्यापही ही यंत्रणा कार्यान्वित केली नसल्याचे आढळून आले. त्यामुळे प्रशासनाने आता जीपीएससाठी 31 जुलैची डेडलाइन दिली आहे. त्यामुळे खडीक्रशरचालक व खाणपट्टेधारकांना या मुदतीत ही यंत्रणा कार्यान्वित करणे गरजेचे असेल. जीपीएस यंत्रणेसाठी प्रशासन एकीकडे आग्रही असताना महसूल यंत्रणेकडून भरारी पथकांच्या सहाय्याने गौण खनिजाचे अवैध उत्खनन व वाहतूक करणार्‍या वाहनांवर कारवाई सुरू केली आहे. अशा घटनांमध्ये शासनाच्या आदेशानुसार प्रसंगी दंड व अन्य कारवाई केली जात आहे.

जिल्ह्यातील एकूण वाहने – 3,544,

वाहनांवर जीपीएस यंत्रणा नाही– 2,231

व्यक्तींवर अवैध वाहतूक प्रकरणी कारवाई– 400

राज्यात गौण खनिजाचे उत्खनन व वाहतुकीच्या संनियंत्रणासाठी ‘महा खनिज’ संगणक प्रणाली लागू करण्यात आली आहे. त्यामुळे गौण खनिज वाहतूक करणार्‍या तसेच जीपीएस यंत्रणा बसविलेल्या वाहनांना परवानगी देण्यात आली आहे. जी वाहने जीपीएसवर नाहीत आणि ती गौण खनिजची वाहतूक करताना आढळतील, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.
– रोहिणी चव्हाण,
जिल्हा खनिकर्म
अधिकारी, नाशिक

हेही वाचा  :

Back to top button