SSC Result 2020 : दहावीतही मुलींचीच भरारी! नाशिक जिल्ह्याचा निकाल ‘असा’ | पुढारी

SSC Result 2020 : दहावीतही मुलींचीच भरारी! नाशिक जिल्ह्याचा निकाल 'असा'

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळामार्फत मार्च-एप्रिल 2022 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यामिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा अर्थात इयत्ता दहावीचा निकाल शुक्रवारी (दि.17) दुपारी 1 वाजता जाहीर करण्यात आला. कोरोनानंतर प्रथमच ऑफलाइन पद्धतीने लेखी परीक्षा घेण्यात आल्याने निकालाकडे सगळ्यांचे लक्ष लागून होते. यंदाही इयत्ता बारावीप्रमाणे दहावीच्या निकालातही मुलीच हुश्शार असल्याचे सिद्ध झाले आहे.

नाशिक विभागात 96.90 टक्के मुली, तर 95.08 टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत.
गेल्या वर्षी इयत्ता नववीचा अंतिम निकाल, इयत्ता दहावीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन व अंतिम तोंडी/प्रात्यक्षिके/अंतर्गत मूल्यमापन आदींच्या आधारे दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला होता. यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर दहावीच्या लेखी परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्यात आली होती. परीक्षेसाठी माध्यमिक शाळा स्तरावर परीक्षा केंद्र व उपकेंद्रांची निर्मिती करण्यात आली होती. विद्यार्थ्यांना पेपरसाठी 15 मिनिटांसाठी जादा वेळ देण्यात आला होता.

नाशिक जिल्ह्यातील 203 परीक्षा केंद्रांवर पार पडलेल्या परीक्षेसाठी 91 हजार 691 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी 88 हजार 367 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असन, जिल्ह्याचा निकाल 96.37 टक्के इतका लागला. 49 हजार 219 मुले प्रविष्ट झाले होते. त्यापैकी 46 हजार 969 मुले उत्तीर्ण झाले असून, त्यांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी 95.42 टक्के इतकी आहे. तर 42 हजार 472 मुली परीक्षेला बसल्या होत्या. त्यापैकी 41 हजार 398 मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. 97.47 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. मुलांपेक्षा 2.05 टक्का मुलींचा निकाल जास्त आहे. दरम्यान, इयत्ता दहावीच्या लेखी परीक्षेत नाशिक विभागात 69 गैरमार्ग प्रकरणे निदर्शनास आली होती. त्यापैकी 64 विद्यार्थ्यांना मंडळ शिक्षासूचीनुसार शास्ती करण्यात आली आहे. त्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील 30, धुळे जिल्ह्यातील 18, जळगाव जिल्ह्यातील 15, तर नंदुरबार जिल्ह्यातील सहा विद्यार्थ्यांचा समावेश आहे. पाच विद्यार्थ्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

तालुकानिहाय निकाल…

दिंडोरी-96.25, देवळा -97.47,  इगतपुरी -97.23, कळवण -96.39, मालेगाव-95.12, नाशिक -96.35, निफाड-95.91, नांदगाव-97.16, चांदवड- 95.76, पेठ -95.66, सुरगाणा -95.50, सटाणा -96.45, सिन्नर -97.51, त्र्यंबकेश्वर-97.11, येवला -97.00, मालेगाव मनपा -94.47, नाशिक मनपा-96.91

श्रेणी सुधारसाठी दोन संधी

दहावीच्या परीक्षेस सर्व विषयांसह प्रविष्ट होऊन उत्तीर्ण होणार्‍या विद्यार्थ्यांसाठी लगतच्या दोन संधी श्रेणी अथवा गुण सुधार योजनेंंतर्गत उपलब्ध राहणार आहे. जुलै-ऑगस्टमध्ये पुरवणी परीक्षा होणार असून, पुनर्परीक्षार्थी व श्रेणी सुधार विद्यार्थ्यांसाठी सोमवार (दि.20) पासून मंडळाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने आवेदनपत्र भरता येणार आहे. तर नियमित विद्यार्थ्यांना गुणपत्रिका वाटपाबाबत स्वतंत्ररीत्या कळविले जाणार आहे.

उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करता येणार

विद्यार्थ्यांना गुणांची पडताळणी व उत्तरपत्रिकांच्या पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. गुणपडताळणीसाठी दि. 20 ते 29 जून या काळात, तर छायाप्रतीसाठी दि. 20 जून ते 9 जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहे. पुनर्मूल्यांकनासाठी उत्तरपत्रिकेची छायाप्रत अनिवार्य करण्यात आली आहे. गुण पडताळणीसह उत्तरपत्रिका पुनर्मूल्यांकनासाठी ठरावीक शुल्क विद्यार्थ्यांना अदा करावे लागणार आहे.

मराठीचा टक्का घसरला

यंदाच्या इयत्ता दहावीच्या निकालात मराठी प्रथम भाषेचा टक्का घसरला असून, विद्यार्थ्यांना मातृभाषेचे वावडे असल्याचे समोर आले आहे. इंग्रजी प्रथम भाषेचा टक्का गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा वाढल्याचे चित्र आहे. मराठी (प्रथम भाषा – 96.65), मराठी (द्वितीय/तृतीय भाषा – 99.40), उर्दू (96.78), हिंदी (प्रथम – 97.72), हिंदी (द्वितीय/तृतीय भाषा – 96.59), इंग्रजी (प्रथम भाषा – 99.63), इंग्रजी (द्वितीय/तृतीय भाषा – 96.32), गणित (97.39), विज्ञान (97.47), तर सामाजिकशास्त्रे (97.44) असा विषयाचा निकाल लागला आहे.

हेही वाचा :

Back to top button