नाशिक : दादासाहेब फाळके स्मारक आजपासून पर्यटकांना खुले | पुढारी

नाशिक : दादासाहेब फाळके स्मारक आजपासून पर्यटकांना खुले

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
चित्रपटमहर्षी दादासाहेब फाळके स्मारकाचे खासगीकरणातून सुशोभीकरण आणि नूतनीकरण करण्याचा निर्णय रद्द केल्यानंतर आता महापालिकाच फाळके स्मारकाचे नूतनीकरण हाती घेणार असून, त्याचाच एक भाग म्हणून गुरुवारपासून (दि. 16) स्मारक खुले करण्यात येणार आहे.

मनपा आयुक्त रमेश पवार यांनी यासंदर्भात निर्णय घेतला असून, पहिल्या टप्प्यात स्मारकातील उद्यान, ऑडिटोरियम तसेच संगीत कारंजा खुला करण्यात येणार आहे. महापालिकेने 1999 मध्ये पाथर्डी फाटा परिसरातील 29 एकर जागेत फाळके स्मारकाची उभारणी केली. मात्र, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या स्मारकातील सुविधा तसेच संगीत कारंजाची तसेच खेळण्यांची दुरवस्था झाली. यामुळे पर्यटकांनी पाठ फिरवली. तर पर्यटकांऐवजी या उद्यानाचा आसरा घेतला तो प्रेमीयुगुलांनी. आजमितीस दरवर्षी 55 लाखांचा तोटा मनपाला सहन करावा लागत असून, ही बाब लक्षात घेत मनपाने खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर या स्मारकाचा पुनर्विकास करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी मनपाने निविदा प्रक्रियादेखील राबविली होती. मात्र, आर्थिक हिशेब पाहता खासगी भागीदारीतून मनपाला हा प्रकल्प परवडणारा नसल्याचा अभिप्राय लेखापरीक्षण विभागाने नोंदविला. तसेच पालकमंत्री छगन भुजबळ यांनीदेखील या प्रकल्पाला विरोध करत मनपानेच स्वत: स्मारकाचा पुनर्विकास करावा, अशी सूचना केली. त्यामुळे मनपा आयुक्त रमेश पवार यांनी निविदा प्रक्रिया रद्द करून मनपानेच हा प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मनपाने स्वत:च ऑडिटोरियम, उद्यान तसेच कारंजा दुरुस्त केला असून, गुरुवारपासून शहरवासीयांसाठी हे उद्यान खुले करण्यात येणार आहे.

स्मारकाची संपूर्ण स्वच्छता करण्यात आली असून, येथील तीन कारंजांपैकी एक कारंजा पहिल्या टप्प्यात सुरू केला जाणार आहे. प्रमुख आकर्षण असलेला संगीत कारंजाही लवकरच सुरू करण्यात येणार आहे. येथील पाइपलाइनचे काम सुरू आहे. वॉटरपार्क 10 वर्षांच्या करारावर ठेकेदाराला चालविण्यास देण्यात येणार आहे. त्यासाठीची निविदा प्रक्रिया राबविण्यात येईल.

हेही वाचा :

Back to top button