

पाटण; गणेशचंद्र पिसाळ : यावर्षी जूनच्या पहिल्या पंधरवड्यात अपेक्षित पाऊस पडलेला नाही. राज्यातील सर्वसामान्य शेतकर्यांसह कोयना धरणावर अवलंबून असलेल्या प्रत्येक घटकाला पावसाची प्रतीक्षा आहे. एक जूनपासून सुरू झालेल्या नव्या तांत्रिक वर्षात चालू पंधरवड्यात अवघा 0.01 टीएमसी इतक्याच पाण्याची आवक झाली आहे.
गत तांत्रिक वर्षात धरणातील पाण्याचा अभूतपूर्व वापर झाल्याने मुळातच धरणात सध्या केवळ 16.54 टीएमसी इतकाच पाणीसाठा शिल्लक असून त्यापैकी उपयुक्त साठा 11.57 टीएमसी इतकाच आहे. त्यातूनही सिंचनासाठी दैनंदिन कोयना धरण पायथा वीजगृहातून वीजनिर्मिती करून प्रतिसेकंद 2100 क्युसेक्स पाणी अखंडपणे पूर्वेकडे सोडण्यात येत आहे. गेल्या अनेक वर्षांचा इतिहास लक्षात घेता धरण यावर्षीही पूर्ण क्षमतेने भरेल यात भलेही शंका नसली तरी अपेक्षित वेळेत पाऊस पडला तर निश्चितच कोयनेसह स्थानिक शेतकर्यांच्या चिंताही दूर होणार आहेत. कोयना धरणाच्या गत तांत्रीक वर्षात आजवरचे अनेक नैसर्गिक व तांत्रिक विक्रम मोडीत निघाले आहेत.
105.25 टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेल्या कोयना धरणातील एकूण पाणीसाठ्यापैकी 67.50 टीएमसी पाणी पश्चिम वीजनिर्मितीसाठी देण्यात येते. गत तांत्रिक वर्षात कोळसा टंचाईमुळे मुळातच कोयना जलविद्युत प्रकल्पातून वेळोवेळी अतिरिक्त वीजनिर्मिती करण्यात आली. ऑक्टोबर व त्यानंतरच्या काळात कोयनेतून मोठ्या प्रमाणावर पाणीवापर झाल्याने ऐन उन्हाळ्यात पाण्याअभावी निम्म्याहून अधिक महाराष्ट्र अंधारात जाण्याची भीती व्यक्त झाली होती. शासन, प्रशासनाने याबाबत सकारात्मक पावले उचलून तब्बल पंधरा टीएमसी अतिरिक्त पाणी पश्चिम वीजनिर्मितीसाठी दिले त्यामुळेच ऐन उन्हाळ्यात अगदी तांत्रिक वर्षाअखेरपर्यंत अखंडित वीजनिर्मिती येथे सुरळीतपणे सुरू राहिली.
सिंचनासाठी वर्षभरात सरासरी 35 टीएमसी पाण्याची गरज असते. सुदैवाने गतवर्षी नोव्हेंबरपर्यंत पाऊस राहिल्याने सरासरीच्या तुलनेत सिंचनाच्या पाण्याची गरज कमी झाली. त्याचाही सकारात्मक परिणाम धरणातील पाण्यावर झाला. वर्षभरात सिंचनासाठी अवघा 21.93 टीएमसी इतकाच पाणीवापर झाला. कोयना धरणासमोर निसर्गाने अनेक आव्हाने निर्माण केली.
जीवित, वित्त व सार्वजनिक हानीही झाली. मात्र या आपत्कालीन परिस्थितीत पावसाळ्यात व त्यानंतर अगदी ऐन उन्हाळ्यात तांत्रिक वर्षाखेरीपर्यंत नियोजनबद्ध कार्यक्रमाने जलसंपदा व ऊर्जा विभागाने केलेले सार्वत्रिक प्रयत्न निश्चितच महाराष्ट्रासह कर्नाटक व आंध्र प्रदेश राज्यांच्याही हिताचे ठरले.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार या वर्षी अपेक्षित व चांगला पाऊस पडेल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मात्र जूनच्या पहिल्या पंधरवड्यात गतवर्षीच्या तुलनेत तब्बल दीडशे मिलिमीटर पाऊस कमी झाला आहे. पहिल्या पंधरवड्यातील हवामान खात्याच्या शक्यतांना निसर्गाने साथ दिली नाही. मुळातच गतवर्षी झालेला अतिरिक्त पाणीवापर व धरणातील कमी प्रमाणातील शिल्लक पाणीसाठा लक्षात घेता आता जूनच्या दुसर्या पंधरवड्यात तरी अपेक्षित पाऊस पडून जूनअखेर धरणात दिलासादायक पाणीसाठा झाला तर निश्चितच चिंता दूर होईल.