नाशिक : मारहाणीत पतीचा मृत्यू ; पत्नीसह तिघांना कोठडी | पुढारी

नाशिक : मारहाणीत पतीचा मृत्यू ; पत्नीसह तिघांना कोठडी

नाशिक : मद्यसेवन व अनैतिक संबंधांवरून त्रस्त होत पत्नी व इतर तिघांनी एकाला मारहाण केली होती. या मारहाणीत अंतर्गत व बाह्य दुखापती झाल्याने चायनिज विक्रेता कैलास बाबूराव साबळे (41, रा. हेडगेवारनगर, सिडको) याचा मृत्यू झाला. या प्रकरणी अंबड पोलिसांनी चौघांनाही सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात अटक केली असून, न्यायालयाने त्यांना 15 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

शरणपूर रस्त्यावरील तिबेटियन मार्केट येथे साबळे यांचे चायनिज खाद्यपदार्थ विक्रीचा व्यवसाय होता. शनिवारी (दि.11) काम संपवून मध्यरात्री साबळे घराजवळ आले होते. तेथे ते तीन मित्रांसोबत बोलले व त्यांच्यासोबतच बाहेर गेले. दरम्यान, मध्यरात्री घरी झोपल्यानंतर त्यांचा झोपेतच मृत्यू झाल्याचे उघडकीस आले. सुरुवातीस मद्याच्या नशेत पडून दुखापत झाल्याने त्यात मृत्यू झाल्याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.

मात्र, पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर व साक्षीदारांचे जबाब तसेच शवविच्छेदन अहवालाच्या आधारे कैलास साबळे यांच्या पत्नी व मित्रांकडे चौकशी केली. त्यात कैलास यांचे अनैतिक संबंध असल्याने पत्नी निशा साबळे यांच्याशी वाद झाला होता. तो मिटवण्यासाठी कैलासचे मित्र ज्ञानेश्वर ऊर्फ पिंटू नागू गायकवाड, बाबू प्यारेलाल कनोजिया व रोहित नंदकुमार पवार यांच्यासह निशाने कैलासला मारहाण केली होती. त्यात कैलास यांना अंतर्गत दुखापती झाल्या. त्यानंतर ते झोपले. मात्र, झोपेतच त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे अंबड पोलिसांत चौघांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल आहे. त्यांना अंबड पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता, दोन दिवसांची कोठडी सुनावली आहे.

हेही वाचा :

Back to top button