नाशिक : ‘शहर धान्य वितरण’वर दिव्यांग बांधवांची धडक | पुढारी

नाशिक : ‘शहर धान्य वितरण’वर दिव्यांग बांधवांची धडक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
दीड वर्ष उलटूनही अंत्योदय योजनेत समावेश होत नसल्याने संतप्त झालेल्या दिव्यांगांनी सोमवारी (दि. 13) नाशिक शहर धान्य वितरण कार्यालयावर धडक दिली. प्रहार दिव्यांग संघटनेच्या नेतृत्वाखाली यावेळी आंदोलन करताना प्रभारी धान्य वितरण अधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले.

शासनाने दिव्यांग बांधवांचा समावेश अंत्योदय योजनेत करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांनी शासन निर्णयानुसार, कार्यवाही करण्याचे आदेश देऊन शहर धान्य वितरण कार्यालयाकडून दिव्यांगांचा समावेश अंत्योदय योजनेत करण्यात आलेला नाही. वारंवार पत्रव्यवहार करूनही कार्यालयाकडून कोणत्याच हालचाली होताना दिसत नाही. सद्यस्थितीत तब्बल 250 अर्ज प्रलंबित आहेत. धान्य वितरण कार्यालयाकडून दिव्यांगांची अवहेलना केली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर प्रहार संघटनेच्या नेतृत्वाखाली शहरातील दिव्यांग बांधवांनी कार्यालयात आंदोलन केले.

आंदोलनावेळी प्रभारी धान्य वितरण अधिकारी कैलास पवार यांना संघटनेकडून निवेदन देण्यात आले. त्यावर मनुष्यबळाची उणीव व ऑनलाइन प्रणालीमधील तांत्रिक बिघाडामुळे विलंब होत असल्याचे पवार यांनी सांगितले. येत्या 15 दिवसांत दिव्यांगांना लाभ न मिळाल्यास कार्यालयावर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला. आंदोलनात प्रहार दिव्यांग संघटनेचे नाशिक शहराध्यक्ष ललित पवार, तालुकाध्यक्ष रवींद्र टिळे, उपशहराध्यक्ष गणेश प्रधान, संघटक दत्ता कांगणे, चंद्रकांत वालझाडे, कल्पेश करंजकर यांच्यासह दिव्यांग बांधव उपस्थित होतेे.

हेही वाचा :

Back to top button