नॉन स्टॉप 300 किलोमीटर सायकलिंग करत केला ‘विक्रम’ | पुढारी

नॉन स्टॉप 300 किलोमीटर सायकलिंग करत केला ‘विक्रम’

सातारा : पुढारी वृत्तसेवा :  अमरावती शहर येथे पोलिस उपायुक्‍त (डीसीपी) असणारे विक्रम साळी यांनी नॉन स्टॉप 300 किलोमीटर सायकलिंग करत ‘विक्रम’ केला. अमरावती शहर येथे पोलिस उपायुक्‍त (डीसीपी) असणारे विक्रम साळी यांनी नॉन स्टॉप 300 किलोमीटर सायकलिंग करत ‘विक्रम’ केला. ते मूळचे रेठरे बु. कराड जि सातारा येथील असून त्यांच्या या विक्रमाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

डीसीपी विक्रम साळी हे पोलिस उपअधीक्षक (2010) म्हणून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून उत्तीर्ण झाले आहेत. राज्य पोलिस दलात दाखल झाल्यानंतर त्यांनी प्रामुख्याने आतापर्यंत विदर्भात सेवा बजावली आहे. सध्या ते अमरावती येथे सेवा बजावत आहेत. फिजीकल फिटनेससाठी ते ओळखले जातात. याचाच एक भाग म्हणून अमरावतीमध्ये सायकल स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. किमान 20 तासामध्ये न थांबता 300 किलोमीटर अंतर पार करत जायचे अशी अट स्पर्धेची होती.

या स्पर्धेत डीसीपी विक्रम साळी यांनी सहभाग घेतला. स्पर्धेला सुरुवात झाल्यानंतर मात्र साळी यांनी 300 किलोमीटरचे अंतर 16 तासात पूर्ण केले. अशाप्रकारे पोलिस दलातून स्पर्धा पूर्ण करणारे विक्रम साळी हे राज्य पोलिस सेवेतील पहिले अधिकारी ठरले आहेत. त्यांच्या यशानंतर अमरावती, राज्य पोलिस दलासह सातारकरांनीही कौतुक केले आहे. दरम्यान, यापूर्वी उपविभागीय पोलिस अधिकारी मंगेश चव्हाण यांनी दुबईत हाफ आयर्नमॅन किताब पटकावला असून तेही मूळचे सातारचे असल्याने हाही एक योगायोग आहे.
डीसीपी विक्रम साळी यांच्याकडे सध्या अमरावती शहर झोन 1 आणि मुख्यालय अशी दुहेरी जबाबदारी आहे. यातूनही ते वेळ काढत रोज पहाटे 3 ते 4 तास सराव करतात. याशिवाय रात्री देखील ते सायकल राईड वरुन आपल्या कामाचा फेरफटका देखील घेत असायचे. दरम्यान, यापूर्वी देखील त्यांनी 200 किलोमीटर सायकलिंग करत कमी वेळेत स्पर्धा पूर्ण केली आहे.

सायकलिंगची स्पर्धा पूर्ण करण्यासाठी डीसीपी साळी यांना अनेक मित्रमंडळी, अधिकार्‍यांचे मार्गदर्शन लाभले आहे. यामध्ये डीसीपी आरती सिंह, डीसीपी गजानन राजमाने, एसपी विशाल गायकवाड, आयर्नमन हार्दिक पाटील, मॅरेथॉन रनर जयेश यमकर, देवानंद भोजे, विजय धुर्वे, अ‍ॅड. अरुणा पुरोहित, आंतराष्ट्रीय सायकलपट्टू डॉ. अमित समर्थ, आई-वडील, पत्नी यांचे मार्गदर्शन लाभले.

Back to top button