Nashik : ‘गोल्डन अवर’मध्ये तक्रार केल्याने सेवानिवृत्ताचे चार लाख पुन्हा खात्यात | पुढारी

Nashik : ‘गोल्डन अवर’मध्ये तक्रार केल्याने सेवानिवृत्ताचे चार लाख पुन्हा खात्यात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
वीजबिल भरल्याची माहिती संकलित करण्याच्या बहाण्याने भामट्याने सेवानिवृत्त वृद्धाच्या मोबाइलचा ताबा क्विक सपोर्ट या रिमोट अ‍ॅक्सेस अ‍ॅपमार्फत घेतला होता. त्यानंतर वृद्धाच्या बँक खात्यातील मुदतठेव मोडून त्यातून सुमारे चार लाख रुपये परस्पर काढून घेतले होते. मात्र, त्या वृद्धाने वेळीच सायबर पोलिसांकडे धाव घेतल्याने व सायबर पोलिसांनीही बँकांशी संपर्क साधून पुढील व्यवहार थांबविल्याने वृद्धाची रक्कम पुन्हा बँक खात्यात वर्ग करण्यात सायबर पोलिसांना यश आले आहे.

बीएसएनएल विभागातून सेवानिवृत्त झालेल्या रामदास शिवराम अमृतकर (73, रा. वडाळा शिवार) यांना दि. 28 मे रोजी वीजबिल न भरल्याचा मेसेज आला व बिल न भरल्यास वीजजोडणी खंडित करण्याचा इशारा मेसेजमध्ये देण्यात आला. त्यामुळे अमृतकर यांनी वीजबिल भरणा केल्याचे सांगितल्याने भामट्याने त्यांना बिल देण्यास सांगितले. त्यासाठी भामट्याने अमृतकर यांना एक लिंक पाठविली. त्यावरून अमृतकर यांच्या मोबाइलमध्ये क्विक सपोर्ट हे अ‍ॅप इन्स्टॉल झाले होते. त्यावरून भामट्याने अमृतकर यांच्या मोबाइलचा ताबा घेतला. त्यानंतर भामट्याने अमृतकर यांच्या इंटरनेट बँकिंगवरून तक्रारदार यांची सात लाखांची मुदतठेव मोडून, त्यातून प्रत्येकी 98 हजार रुपयांचे चार व्यवहार करून तीन लाख 98 हजार 498 रुपये परस्पर काढून घेतले. ही बाब समोर येताच, अमृतकर यांनी मुलीसह सायबर पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. सायबरचे पोलिस उपनिरीक्षक दानिश मन्सुरी व अंमलदार अनिल राठोड यांनी वरिष्ठ पोलिस निरीक्षक सूरज बिजली यांच्या मार्गदर्शनाखली तातडीने पावले उचलत आर्थिक व्यवहार तपासले.

भामट्याने अमृतकर यांच्या बँक खात्यातून काढलेली रक्कम क्रेडिट कार्डचे थकीत बिल भरण्यासाठी वापरत असल्याचे सायबर पोलिसांना आढळले. पोलिसांनी तातडीने संबंधित बँक व क्रेडिट कार्ड कंपनीशी संपर्क साधून व्यवहार थांबविण्यास सांगितले. बँकांनीही भामट्याचे दोन्ही क्रेडिट कार्ड ब्लॉक केले व व्यवहार थांबविले. त्यामुळे तिसर्‍या दिवशी अमृतकर यांच्या बँक खात्यातून गेलेले सर्व पैसे पुन्हा त्यांना मिळण्यास मदत झाली.

नागरिकांनी कोणतेही अनोळखी अ‍ॅप, लिंक मोबाइलमध्ये ओपन किंवा इन्स्टॉल करू नये. आपल्या बँक खात्याची माहिती कोणालाही देऊ नये. ऑनलाइन फसवणूक झाली असल्यास तातडीने सायबर पोलिस किंवा जवळील पोलिस ठाण्यात संपर्क साधावा. जेणेकरून पुढील व्यवहार थांबवून पैसे परत मिळवता येतील.
– सूरज बिजली, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सायबर पोलिस ठाणे

फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच वडिलांनी पोलिसांकडे तक्रार केली. तसेच मोबाइलमधील क्विक सपोर्ट हे अ‍ॅप काढून टाकले. पोलिसांनीही सहकार्य करीत बँकेशी पत्रव्यवहार करून आर्थिक व्यवहार थांबवले. पोलिसांच्या मदतीने आम्हाला आमचे पैसे परत मिळाले.
– नीलेश अमृतकर, तक्रारदारांचा मुलगा

हेही वाचा :

Back to top button