नाशिक : श्रवण, वाचन, मनन या त्रिसूत्रीने मिळाले यश; मच्छिंद्र शिरसाठ यांची कर्नलपदावर बढती, ठाणगावकरांतर्फे नागरी सत्कार | पुढारी

नाशिक : श्रवण, वाचन, मनन या त्रिसूत्रीने मिळाले यश; मच्छिंद्र शिरसाठ यांची कर्नलपदावर बढती, ठाणगावकरांतर्फे नागरी सत्कार

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
श्रवण, वाचन व मनन या त्रिसूत्रीने अभ्यासात आपोआपच गोडी लागते. त्यातून प्रामाणिकता येते आणि प्रामाणिकता हाच यशाकडे घेऊन जाणारा राजमार्ग आहे, असे प्रतिपादन भारतीय सैन्य दलात कर्नलपदाला गवसणी घालणारे ठाणगावचे भूमिपुत्र कर्नल मच्छिंद्र शिरसाठ यांनी केले.

कर्नलपदावर बढती मिळाल्याबद्दल ठाणगाव ग्रामस्थांच्या वतीने शिरसाठ यांच्या नागरी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. बाजार समितीचे माजी सभापती नामदेवराव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात व्यासपीठावर सरपंच सीमा शिंदे, विकास संस्थेचे चेअरमन अमित पानसरे, सिन्नर तालुका खादी ग्रामोद्योग मंडळाच्या चेअरमन लता शिंदे, माजी जि. प. सदस्य वनिता शिंदे, ए. टी. शिंदे, उपसरपंच शेखर कर्डिले, राजेंद्र भावसार, रामदास भोर, ग्रामसेवक डी. बी. भोसले आदी उपस्थित होते. कर्नल शिरसाठ यांनी आई-वडिलांनी खडतर परिश्रम घेतले. माझ्यात प्रतिकूल परिस्थितीत शिकण्याची जिद्द कायम राहिली. त्यामुळे यश गाठता आल्याचे सांगितले. आयुष्यातील कठीण प्रसंगांचा त्यांनी उल्लेख केला. दरम्यान, कर्नल शिरसाठ यांचे फटाक्याच्या आतषबाजीत जंगी स्वागत करण्यात आले. संपूर्ण गावातून डीजेच्या तालावर देशभक्तीपर गीतांच्या साथीने मिरवणूक काढण्यात आली. घरोघरी औक्षण करून शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी अशोक काकड, निशा मोरे, तानाजी शिंदे, राजेंद्र काकड, सचिन रायजादे, यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. अनिल शिंदे यांनी सूत्रसंचालन केले, तर रामदास भोर यांनी आभार मानले.

सैन्यदलात शिपाई ते कर्नल पदापर्यंत उत्तुंग झेप
सैन्यदलात शिपाई म्हणून भरती झालेल्या शिरसाठ यांनी अभ्यासातील सातत्य आणि जिद्दीच्या जोरावर लेफ्टनंट, मेजर, लेफ्टनंट कर्नल आणि आता कर्नल पदाला गवसणी घातली. त्यांच्या आयुष्याचा हा प्रवास खडतर आहे. तरुणांनी त्यांची प्रेरणा घ्यावी, असे आवाहन करीत मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. लहानपणापासूनच हाताला मिळेल ते काम करून कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी आणि शिक्षणाचा खर्च भागविण्यासाठी कर्नल शिरसाठ यांनी केलेले प्रयत्न सफल ठरल्याचे विनायक काकड, पत्रकार संदीप भोर, ग्रामसेवक भोसले, उपसरपंच शेखर कर्डिले, ए. टी. शिंदे, नामदेव शिंदे यांनी सांगितले.

यांचा झाला नागरी सत्कार – यावेळी अशोक शिंदे याची बाजार समिती येथे अशासकीय प्रशासकीय मंडळावर, सिन्नर तालुका खादी ग्रामोद्योग मंडळाच्या चेअरमन लता शिंदे, सैन्यदलात नायब सुभेदार म्हणून वसंत शिंदे, विकास संस्थेच्या अध्यक्षपदी अमित पानसरे, तर योगेश शिंदे यांची अण्णासाहेब पाटील महामंडळावर निवड झाल्याबद्दल नागरी सत्कार करण्यात आला.

हेही वाचा:

Back to top button