नाशिक : प्रभागनिहाय प्रारूप मतदारयाद्या 17 जूनला | पुढारी

नाशिक : प्रभागनिहाय प्रारूप मतदारयाद्या 17 जूनला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना आणि आरक्षण सोडत झाल्यानंतर आता राज्य निवडणूक आयोगाने प्रभागनिहाय प्रारूप मतदारयाद्यांचा कार्यक्रम घोषित केला आहे. यामुळे आगामी निवडणुकीच्या द़ृष्टीने निवडणूक आयोगाने आणखी एक टप्पा पार केला असून, येत्या 17 जून रोजी प्रारूप मतदारयाद्या जाहीर करण्यात येणार आहे. त्यावर हरकती व सूचना दाखल करण्याकरता एक आठवड्याची मुदत दिली आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर निवडणूक आयोगाने गेल्या महिन्यात 13 मे रोजी अंतिम प्रभाग रचना जाहीर केली. त्यानंतर 31 मे रोजी महापलिकांच्या माध्यमातून ओबीसीशिवाय अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला) आणि सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. त्यामुळे निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असून, निवडणुका लांबणीवर पडल्याने ओबीसी आरक्षणासाठी इम्पिरिकल डेटा गोळा करण्यासाठी राज्य शासनालादेखील पुरेसा वेळ मिळाला आहे. त्यात आता निवडणूक आयोगाने प्रारूप मतदारयाद्यांचा कार्यक्रम घोषित केला आहे. त्यामुळे निवडणूक तयारीच्या द़ृष्टीने इच्छुकांच्या नजरा ओबीसी आरक्षणाकडे लागल्या आहेत. राज्य निवडणूक आयोगाने प्रभागनिहाय मतदारयाद्यांसाठी जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार दि. 17 जून रोजी प्रभागनिहाय प्रारूप मतदारयाद्या प्रसिद्ध केल्या जाणार असून, त्यावर 17 ते 25 जूनपर्यंत हरकती आणि सूचना मागविण्यात आल्या आहेत. त्यानंतर दि. 7 जुलै रोजी अंतिम प्रभागनिहाय मतदारयादी प्रसिद्ध केली जाईल.
महापालिका निवडणुकांसाठी 1 जानेवारी 2022 हा अर्हता दिनांक ग्राह्य धरून केंद्रीय निवडणूक आयोगाकडून 31 मे 2022 पर्यंत अद्ययावत केलेली विधानसभेची मतदारयादी वापरली जाणार आहे. विधानसभा मतदारयाद्यांचे प्रभागांच्या क्षेत्रानुसार विभाजन केले जाणार आहे.

…असे होणार मतदारयाद्यांचे विभाजन
दि. 5 जानेवारी 2022 पर्यंत प्रसिद्ध मतदारयादीच्या आधारे प्रारूप प्रभाग रचनेप्रमाणे मतदारयाद्यांचे विभाजन करण्यात आले होते. त्यानंतर आयोगाने दि. 13 मे रोजी अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध केली होती. त्यातील बदलानुसार मतदारयाद्यांचे सुधारित विभाजन करण्याचे आणि दि. 5 जानेवारी ते 31 मे 2022 पर्यंत विधानसभा मतदारयाद्यांमध्ये समाविष्ट झालेल्या तसेच वगळलेल्या आणि दुरुस्त्या विचारात घेऊन मतदारयादीचे विभाजन करण्यात येणार आहे.

हेही वाचा:

Back to top button