नाशिक : पेट्रोलपंपांवर ठणठणाट ; 400 डीलर्स आंदोलनात, वाहनचालकांची गैरसोय | पुढारी

नाशिक : पेट्रोलपंपांवर ठणठणाट ; 400 डीलर्स आंदोलनात, वाहनचालकांची गैरसोय

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलचे दर कमी करताना पेट्रोलियम डीलरच्या नुकसानीचा कोणताही विचार केला नाही. त्यामुळे देशभरातील डीलर्सचे तीन हजार कोटींचे झालेले नुकसान भरून द्यावे, तसेच 2017 पासून अडकलेल्या डीलर्सच्या कमिशनमध्ये वाढ करावी. या प्रमुख मागण्यांसाठी पेट्रोलपंपचालकांनी पुकारलेल्या इंधन खरेदी बंद आंदोलनात जिल्ह्यातील तब्बल चारशे डीलर्सने सहभाग नोंदविला. त्यामुळे दुपारनंतर बहुतांश पंपांवर पेट्रोल-डिझेलचा ठणठणाट बघावयास मिळाल्याने वाहनधारकांचे हाल झाले.

विविध मागण्यांसाठी पेट्रोलपंपचालकांनी ‘खरेदी बंद’ आंदोलन पुकारले होते. मात्र, वाहनधारकांचे हाल होऊ नयेत म्हणून पेट्रोल-डिझेलची विक्री सुरूच ठेवली. परंतु, शहरातील बहुतांश पंपांवर दुपारनंतर पेट्रोल-डिझेलच उपलब्ध नसल्याने ग्राहकांचे हाल झाले. अगोदरच गेल्या काही दिवसांपासून शहरात इंधनाचा कृत्रिम तुटवडा निर्माण केला जात आहे. एका पंपावर तर सातत्याने पेट्रोल बंदचा फलक लावला जात असल्याने, वाहनधारकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. अशात या आंदोलनाची भर पडल्याने, नोकरदारांसह मोठमोठ्या व्यापार, उद्योग समूहालादेखील आंदोलनाचा मोठा फटका बसल्याचे दिसून आले. दरम्यान, पंपचालकांचे आंदोलन 80 टक्के यशस्वी झाल्याचा दावा जिल्हा पेट्रोल डीलर्स वेल्फेअर असोसिएशनने केला आहे. या आंदोलनात जिल्ह्यातील 400 डीलर्सने सहभाग नोंदवत पेट्रोलियम कंपन्यांकडून पेट्रोल-डिझेलची खरेदी करण्यास नकार दिला. नाशिकसह धुळे व नंदुरबार येथील 200 डीलर्स सहभागी झाले होते. सकाळी 9 पासूनच पंपचालकांनी मनमाड, पानेवाडी येथील भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन डेपोसमोर जमून लक्षवेधी निदर्शने केली. यावेळी 2017 पासून पेट्रोलियम डीलर्सच्या कमिशनमध्ये तातडीने वाढ केली जावी, अशी मागणी केली. तसेच विस्कळीत झालेला इंधनाचा पुरवठादेखील तातडीने सुरळीत करावा, अशीही मागणी या आंदोलनात असोसिएशनचे अध्यक्ष भूषण भोसले, माजी अध्यक्ष नितीन धात्रक, उपाध्यक्ष साहेबराव महाले, सचिव सुदर्शन पाटील, सदस्य तेहसीन खान, दिनेश धात्रक, हेमचंद्र मोरे, सुजय खैरनार, डी. व्ही. शहा, संजय कोठुळे, विनोद बनकर, पंकज कोकाटे, भारत टाकेकर, शरद गुंजाळ, झिया जारीवला आदी सहभागी झाले होते. यावेळी विविध मागण्यांसाठी आंदोलनात नाशिक, धुळे, नंदुरबार येथील डीलर्स उपस्थित होते.

जिल्ह्यातील 400 डीलर्सने या आंदोलनात सहभाग नोंदवल्याने हा संप 80 टक्के यशस्वी झाला, असे म्हणता येईल. वाहनधारकांची गैरसोय होऊ नये म्हणून सर्व पंप सुरू ठेवण्यात आले होते. आंदोलनासाठी नाशिकसह धुळे, नंदुरबार येथील डीलर्सदेखील सहभागी झाले होते. शासनाने आमच्या मागण्यांचा विचार करावा.
– भूषण भोसले, अध्यक्ष, नाशिक जिल्हा पेट्रोल डीलर्स वेल्फेअर असोसिएशन

3 हजार कोटींचे नुकसान
देशभरातील डीलर्सचे सुमारे तीन हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा याप्रसंगी करण्यात आला. त्याचबरोबर 16 जून 2017 पासून देशात लागू केलेल्या दैनंदिन किमतीबाबतच्या धोरणांचा वापर ग्राहकांना फायदा पोहोचवण्यापेक्षा पेट्रोलियम कंपन्या त्यांच्या सोयीप्रमाणे वापर करीत असल्याने, ती पद्धत बदलण्यात यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

हेही वाचा :

Back to top button