

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून उत्तर प्रदेशच्या इम्रान प्रतापगढी यांना उमेदवारी देण्याच्या मुद्द्यावरून काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात खदखद सुरू झाली आहे. सोमवारी याच मुद्द्यावरून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्यानंतर मंगळवारी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आशिष देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. प्रतापगढी हे काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांच्या विशेष मर्जीतील मानले जातात.
महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी स्थानिक उमेदवारच द्यायला हवा होता. त्याऐवजी उत्तर प्रदेशातील नेत्याला उमेदवारी दिली आणि हा राज्यातील तमाम काँग्रेस कार्यकर्त्यांचा अपमान आहे, असे देशमुख यांनी आपल्या नाराजीनाम्यात म्हटले आहे. प्रतापगढी हे काँग्रेसच्या अल्पसंख्य विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. काँग्रेसचे आणखी एक नेते विश्वबंधू राय यांनीही यासंदर्भात सोनिया गांधी यांना पत्र लिहून आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. मुरादाबाद लोकसभा मतदारसंघातून प्रतापगढी यांना तब्बल सहा लाख मतांच्या फरकाने दारुण पराभव स्वीकारावा लागला होता. आतापर्यंत त्यांनी काँग्रेसला नगरपालिकेची निवडणूकदेखील जिंकून दिलेली नाही. तरीही त्यांना अल्पसंख्य विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष बनवले जाते हे वेदनादायी आहे, असे राय यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
काँग्रेसचे आणखी एक नेते प्रमोद कृष्णन यांनीही अनुभवी व बुद्धिमान व्यक्तींना राज्यसभेवर पाठवले जावे, अशी अपेक्षा व्यक्त करताना प्रतापगढी यांच्या उमेदवारीवरून संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, सोमवारी अशाच भावना अभिनेत्री नगमा यांनी व्यक्त केल्या होत्या. प्रतापगढी यांना उमेदवारी दिल्यानंतर त्यांनी उघड नाराजी व्यक्त केली होती. एकूणच प्रतापगढी यांची उमेदवारी काँग्रेससाठी अडचणीचा विषय होत चालली आहे.