नाशिक: महिला आरक्षणामुळे ‘कहीं खुशी, कहीं गम’ | पुढारी

नाशिक: महिला आरक्षणामुळे ‘कहीं खुशी, कहीं गम’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मनपा सार्वत्रिक निवडणूक- 2022 साठी 44 प्रभागांतील 133 जागांपैकी 67 जागांवर महिला आरक्षण दिले जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर कार्यक्रम मंगळवारी (दि. 31) सकाळी दहा वाजता दादासाहेब गायकवाड सभागृहात महिलांसाठी प्रभागनिहाय आरक्षण सोडत काढण्यात आली आहे. काही प्रभागांत दोन जागांवर महिला आरक्षण पडले. तर काही प्रभागांत वाढीव महिला आरक्षण न पडल्याने सर्वसाधारण प्रवर्गासाठी जागा अराखीव राहिल्या. त्यामुळे इच्छुकांमध्ये ’कही गम कही खुशी’चे वातावरण आहे.

राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मनपा आयुक्त रमेश पवार व प्रशासन उपआयुक्त मनोज घोडे-पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत अनुसूचित जाती (महिला)-10, अनुसूचित जमाती (महिला)- 5 व सर्वसाधारण महिला- 12 जागा निश्चितीसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. तर 40 जागांवर थेट सर्वसाधारण महिलांना संधी देण्यात आली आहे. चिठ्ठी काढण्यासाठी महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना पाचारण करण्यात आले होते. सर्वप्रथम अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी आरक्षण प्रक्रिया पार पडली. पहिली चिठ्ठी प्रभाग 12 अ ची निघाली. आरक्षण सोडत जाहीर होताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

तत्पूर्वी, आयुक्त पवार आणि उपआयुक्त घोडे-पाटील यांनी पीपीटी प्रेझेंटेशनद्वारे महिला आरक्षण सोडतीच्या संपूर्ण प्रक्रियेची माहिती उपस्थितांना दिली आहे. प्रत्यक्ष सोडतीच्या काळात उपस्थितांच्या शंकांचे वेळोवेळी निरसन करण्यात आले. सोडतीच्या ठिकाणी उद्भवणारे वाद, तांत्रिक अडचणी तसेच गर्दी टाळण्यासाठी महापालिकेने संपूर्ण प्रक्रियेचे फेसबुक लाइव्ह केेले. त्यामुळे अनेक इच्छुकांनी महिला आरक्षणांची माहिती जाणून घेतली. अर्धा तास उशिराने सुरू झालेली प्रक्रिया तब्बल दोन तासांनंतर संपली. यावेळी माजी नगरसेवक शाहू खैरे, समीर कांबळे, प्रकाश लोंढे, संजय चव्हाण, संजय भालेराव, गुलजार कोकणी, सुषमा पगारे, सुफी जीन, नितीन साळवे, बाळा कोकणी, अमित कंटक, सुभाष घिया, दीपक डोके, आकाश साळवे आदींसह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते तसेच इच्छुक उपस्थित होते. दरम्यान, सोडत प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर सभागृहाबाहेर तसेच आतमध्ये चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सहायक पोलिस आयुक्त दीपाली खन्ना, पोलिस निरीक्षक सुनील रोहकले आदींसह वरिष्ठ अधिकारी-कर्मचारी परिसरात ठाण मांडून होते.

हेही वाचा :

Back to top button