नाशिक : उड्डाणपुलासंदर्भात ठेकेदाराला अंतिम नोटीस देणार | पुढारी

नाशिक : उड्डाणपुलासंदर्भात ठेकेदाराला अंतिम नोटीस देणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महापालिकेच्या सिडको विभागातील त्रिमूर्ती चौक ते सिटी सेंटर मॉल चौक या उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी कार्यारंभ आदेश देऊनही ठेकेदाराकडून काम सुरू केले जात नसल्याने मनपाच्या बांधकाम विभागाकडून ठेकेदाराला अंतिम नोटीस जारी केली जाणार आहे.

दरम्यान, त्रिमूर्ती ते सिटी सेंटर मॉल चौक उड्डाणपुलाबरोबरच सिटी सेंटर ते मायको सर्कल या पुलाचे कामही मिळावे, याकरिता संबंधित ठेकेदार अडून बसला आहे. मात्र, मायको सर्कलच्या उड्डाणपुलाला मनपा प्रशासनाकडून ब्रेक लावण्यात आला आहे. त्यामुळे ठेकेदार आणि महापालिका यांच्यात या प्रकरणावरून पत्रव्यवहार सुरू आहे. ठेकेदाराला अंतिम नोटिसीद्वारे शेवटची संधी दिली जाणार आहे. त्यानंतर एका पुलासाठी देण्यात आलेला कार्यारंभ आदेशही रद्द केला जाणार असल्याची माहिती शहर अभियंता शिवकुमार वंजारी यांनी दिली आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती खराब असूनही, अडीचशे कोटींचे उड्डाणपुलाचे काम हाती घेण्यात आले. त्यातही गेल्या एक-दीड वर्षांपासून हे दोन्ही उड्डाणपूल वादात सापडलेले आहेत. विशिष्ट ठेकेदाराला डोळ्यासमोर ठेवून निविदा प्रक्रिया राबविण्याबरोबरच नागरिकांचा विरोध आणि सिमेंटची ग्रेड बदलण्यावरून वाद सुरू असल्याने याच मुद्दयांच्या आधारे भाजपचे नगरसेवक मुकेश शहाणे यांनी तसेच वृक्षतोडीविरोधात पर्यावरणप्रेमींनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. मात्र, त्याआधीच तत्कालीन आयुक्त कैलास जाधव यांनी बदलीच्या चार दिवस आधीच त्रिमूर्ती चौकातील उड्डाणपुलाचा कार्यारंभ आदेश दिल्याने मनपाची पंचाईत झाली आहे.

पालकमंत्र्यांचे कामे रद्दचे आदेश 
पालकमंत्री छगन भुजबळ यांनी महापालिकेतील कामकाजाचा आढावा घेताना, दोन्ही उड्डाणपुलांची कामे रद्द करण्याचे आदेश दिले होते. परंतु, एका पुलाला कार्यारंभ आदेश दिल्याने संबंधित ठेकेदार न्यायालयात जाऊ शकतो, या अंदाजाने मनपाकडून त्रिमूर्ती चौक उड्डाणपुलाचे काम करण्यास ठेकेदाराला सांगितले जात आहे, तर मायको सर्कल उड्डाणपुलाचे काम मनपाने रद्दच केले आहे.

हेही वाचा:

Back to top button