Pimpri Crime News : क्रौर्याचा कळस! पत्नीच्या गुप्तांगाला लावले कुलूप, खिळ्याने पाडले छिद्र; मनोविकृत पती गजाआड | पुढारी

Pimpri Crime News : क्रौर्याचा कळस! पत्नीच्या गुप्तांगाला लावले कुलूप, खिळ्याने पाडले छिद्र; मनोविकृत पती गजाआड

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : Pimpri Crime News | पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत नराधम पतीने तिच्या गुप्तांगाला अक्षरश: खिळ्याने छिद्र पाडून कुलूप लावले. त्यानंतर कुलुपाची चावी फेकून दिली. आठवडाभर पत्नीने असहाय वेदना सहन केल्यानंतर अखेर रूग्णालय गाठले. त्यानंतर हा विकृत प्रकार समोर आला आहे. ही घटना वाकड येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी २८ वर्षीय पत्नीने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, ३० वर्षीय पतीला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला आणि तिचा पती मुळचे नेपाळचे आहेत. आरोपी पतीची बहिण आणि मेहूणे वाकड – सुर्या अंडरपास येथे वास्तव्यास आहेत. आरोपीचे मेहूणे एका गॅरेजमध्ये कामाला आहेत. आरोपी पतीला दारूचे व्यसन आहे. आरोपी काहीच काम-धंदा करीत नाही. या दाम्पत्याला पाच आणि तीन वर्षीय दोन मुली आणि नऊ महिन्याचा एक मुलगा आहे. दरम्यान, आरोपी पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन आरोपी पती पत्नीला वारंवार मारहाण करत होता.

भाऊ काहीच काम करीत नसल्याने बहिणीने त्याला पुण्यात बोलावून घेतले. सात ते आठ दिवसांपूर्वीच हे दाम्पत्य वाकड येथे आले होते. बहिणीच्या घराशेजारीच आरोपी राहत होता. वाकड येथे आल्यानंतर या दाम्पत्यामधील वाद अधिक वाढला. चारित्र्याच्या संशयावरून आरोपी हा पत्नीला सतत मारहाण करू लागला. दि. ११ मे रोजी रात्री दहाच्या सुमारास त्याने पुन्हा पत्नीला चारित्र्याच्या संशयावरून मारहाण केली.

पत्नीच्या ब्लेडने गुप्तांगावर वार करून तिला गंभीर जखमी केले. यावर न थांबता त्याने पत्नीला चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर पत्नीला ओढणीच्या सहाय्याने बांधून पतीने लोखंडी खिळ्याने पत्नीच्या गुप्तांगाला छिद्र पाडले आणि कुलूप लावले. गेले आठवडाभर विवाहितेने सर्व त्रास अंगावर काढला. असहाय वेदना होऊ लागल्यानंतर अखेर तिने महापालिकेचे यशवंतराव चव्हाण रूग्णालय गाठले. त्यानंतर हा अमानवी प्रकार समोर आला. हा प्रकार उघडकीस येताच पोलिसांनी आरोपी पतीला बेड्या ठोकल्या. या प्रकरणाचा पुढील तपास फौजदार बालाजी मेटे तपास करीत आहेत.

कुलूप लावून चावी दिली फेकून

विकृत पतीने ११ मे रोजी विवाहितेच्या गुप्तांगावर ब्लेडने वार केले. गुप्तांगाला छिद्र पाडून कुलूप लावले. त्यानंतर त्याने चावी फेकून दिली. सहा दिवस पत्नीने त्रास सहन केला. मात्र, जखमांमध्ये इन्फेक्शन होऊन जखमा चिघळण्यास सुरूवात झाली. वेदना सहन करण्याच्या पलीकडे गेल्यानंतर पत्नीने रूग्णालयात धाव घेतली. हा प्रकार पाहिल्यानंतर उपचार करणारे डॉक्टरही हादरून गेले. चावी मिळत नसल्याने अखेर डॉक्टरांवर शस्त्रक्रिया करून कुलूप काढण्याची वेळ आली.

वडिलांचाही फोडला होता डोळा

आरोपी पती हा मनोविकृत असून गावी नेपाळ येथेही तो पत्नीवर अत्याचार करीत होता. एवढेच नाही तर या विकृताने वडीलांबरोबर झालेल्या वादात त्यांचा डोळा फोडल्याचा धक्कादायक प्रकारही तपासात समोर आला आहे. आरोपी पतीला अटक केल्यानंतर पोलीसांनी त्याला नायालयात हजर केले. यावेळी न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी दिली. त्याची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे.

Back to top button