नाशिक : पेट्रोलपंपचालकांच्या प्रश्नांत लक्ष घाला ; भुजबळांचे पवारांकडे बोट | पुढारी

नाशिक : पेट्रोलपंपचालकांच्या प्रश्नांत लक्ष घाला ; भुजबळांचे पवारांकडे बोट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक जिल्ह्याला केंद्रीय मंत्री भारती पवार लाभलेल्या आहेत. त्यामुळे पेट्रोलपंपचालकांच्या समस्या त्यांच्या माध्यमातून त्या सोडवता येतील. नाशिक जिल्ह्यात पेट्रोल-डिझेलचा कोटा कमी दिला जातो, असे पेट्रोलपंपचालकांचे म्हणणे आहे. डॉ. भारती पवार यांनी संबंधित केंद्रीय मंत्र्यांच्या माध्यमातून या प्रश्नात लक्ष घालावे, अशा शब्दांत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी पेट्रोलपंपचालकांच्या खरेदी बंद आंदोलनाचा चेंडू भाजपच्या कोर्टात टोलावला आहे.

नाशिक जिल्ह्यात पेट्रोलपंपचालकांनी पेट्रोल-डिझेल खरेदी आंदोलन 31 मेपासून करण्याचे जाहीर केले आहे. पेट्रोलियम कंपन्यांच्या मनमानीविरोधात हे आंदोलन असल्याचे पेट्रोलपंपचालकांच्या संघटनेतर्फे सांगितले जात आहे. पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जिल्हा परिषदेचा आढावा घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना या संपाबाबत भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, पेट्रोलपंपचालकांचे काही प्रश्न आहेत. त्यात पेट्रोलियम कंपन्यांकडून पेट्रोल-डिझेल कोटा कमी दिला जात असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. सुदैवाने नाशिकमध्ये केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार आहेत. त्यांनी या प्रश्नात लक्ष घालून संंबंधित मंत्र्यांकडून या समस्या मार्गी लावाव्यात, असे त्यांनी सांगितले. यापेक्षा अधिक ते बोलले नाहीत. यामुळे त्यांनी पेट्रोलपंपचालकांच्या समस्यांचा चेंडू भाजपच्या कोर्टात टोलावला असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, पेट्रोलपंपचालकांच्या या संपाच्या आधीच नाशिकमध्ये अनेक पेट्रोलपंपांवर पेट्रोल-डिझेल शिल्लक नसल्याचे फलक लावण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे नागरिकही पेट्रोल मिळणार नाही या भीतीने पंपांवर गर्दी करीत आहेत. त्यामुळे पेट्रोलपंपांवरील ग्राहकांच्या रांगा वाढल्या आहेत. हा संप संपूर्ण राज्यभर होणार असल्याचे सांगितले जात आहे.

हेही वाचा :

Back to top button