धुळे : अवैध पिस्तूल बाळगणाऱ्या तरुणास अटक, पिस्तूल व काडतूसे जप्त | पुढारी

धुळे : अवैध पिस्तूल बाळगणाऱ्या तरुणास अटक, पिस्तूल व काडतूसे जप्त

धुळे : पुढारी वृत्तसेवा

धुळे तालुक्यातील मुकटी येथून एका तरुणाकडून गावठी बनावटीचे पिस्तूल आणि चार जिवंत काडतूस स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक हेमंत पाटील यांच्या पथकाने जप्त केले आहे. या शस्त्र तस्करी प्रकरणात आणखी दोघांची नावे पुढे आली आहेत.

दरम्यान जानेवारी ते आतापावेतो तेरा गुन्ह्यांमध्ये अठरा पिस्तूलसह 31 काडतुसे जप्त केले असून एकूण 17 आरोपींना अटक केली आहे. त्याचप्रमाणे सात वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये १३ जणांकडून अन्य 96 हत्यारे देखील जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी दिली.

धुळे जिल्हा मध्यप्रदेश सीमेला लागून असल्यामुळे या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध शस्त्र बाळगले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी जिल्ह्यात अवैध शस्त्र निर्मूलनासाठी धडक मोहीम राबविण्याचे आदेश सर्वच पोलिस ठाण्याच्या निरीक्षकांना दिले. यासंदर्भात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने आज धुळे तालुक्यातील मुकटी येथे एका घरावर छापा टाकून आकाश बन्सीलाल पवार याला ताब्यात घेतले. त्याच्या घरातून 33 हजार रुपये किमतीचे एक गावठी बनावटीचे पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

त्याची चौकशी केली असता या तस्करी मध्ये आणखी दोघांची नावे पुढे आली आहेत. या तिघा आरोपींच्या विरोधात तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना पोलीस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी सांगितले की, गेल्या जानेवारी महिन्यापासून धुळे जिल्ह्यातील अवैध शस्त्र तस्करी रोखण्यासाठी कठोर पावले उचलणे सुरू केले आहे. या अंतर्गत जानेवारी महिन्यापासून १७ जणांवर छापे टाकून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. या आरोपीकडून 18 कट्टे आणि 31 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली असून या प्रकरणात वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात 13 गुन्हे दाखल आहेत. जिल्ह्यात अवैध शस्त्र बाळगणाऱ्या 13 जणांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून देखील 96 शस्त्र जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणात सात गुन्हे दाखल असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. यापुढे देखील जिल्ह्यात अवैध शस्त्र निर्मूलनासाठी धडक मोहीम राबवली जाणार असल्याने नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत अवैधपणे शस्त्र विकत घेऊ नये, असे आवाहन पोलीस अधीक्षक पाटील यांनी केले आहे.

हेही वाचा :

Back to top button