IPL 2022 Top Flops : विराट-रोहितसह ‘हे’ खेळाडू ठरले यंदाच्‍या आयपीएलमध्‍ये फ्‍लॉप | पुढारी

IPL 2022 Top Flops : विराट-रोहितसह 'हे' खेळाडू ठरले यंदाच्‍या आयपीएलमध्‍ये फ्‍लॉप

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : यंदाची आयपीएल स्‍पर्धा अनेक अर्थाने गाजली. एकीकडे भारताचे दिग्‍गज खेळाडू फ्‍लॉप ठरत असताना काही नवोदित खेळाडूंनी लक्षणीय कामगिरी आपल्‍या नावावर नोंदवली. नोव्‍हेंबर २०२२ मध्‍ये ऑस्‍ट्रेलियात टी-२० विश्‍वचषक स्‍पर्धा होणार आहे. त्‍यामुळे यंदाच्‍या आयपीएलमध्‍ये भारतीय क्रिकेट संघातील दिग्‍गज खेळाडूंच्‍या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष वेधले होते. मात्र भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा, माजी कर्णधार विराट कोहली यांच्‍यासह अनेक खेळाडुंची कामगिरी निराशाजनक राहिली. ( IPL 2022 Top Flops ) जाणून घेवूया, आयपीएल २०२२ स्‍पर्धेतील भारताच्‍या पाच दिग्‍गज खेळाडूंनी केलेल्‍या कामगिरी.

IPL 2022 Top Flops : रोहित शर्मा : संपूर्ण स्‍पर्धेत एकही अर्धशतक नाही

rohit sharma www.pudharinews.com
rohit sharma www.pudharinews.com

यंदाच्‍या आयपीएल सीजनमध्‍ये भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा दमदार कामगिरी करेल, असा विश्‍वास त्‍याच्‍या चाहत्‍यांना होता. मात्र त्‍याने निराशा केली. आजवरच्‍या आयपीएलमधील रोहित शर्माचीही सर्वात निराशाजनक कामगिरी राहिली आहे. त्‍याने १४ सामन्‍यांमध्‍ये केवळ २६८ धावा केल्‍या. संपूर्ण स्‍पर्धेत त्‍याने एकही अर्धशतक झळकावले नाही. यंदा त्‍याची सर्वोत्‍कृष्‍ट धावसंख्‍या ही ४८ होती. केवळ सहावेळा त्‍याने २० पेक्षा अधिक धावा केल्‍या. रोहित शर्मा प्‍लॉप ठरल्‍याचा सर्वाधिक फटका मुंबई इंडियन्‍स टीमला बसला. संपूर्ण सीजनमध्‍ये या संघाने केवळ ४ सामने जिंकले. आयपीएलच्‍या इतिहासात प्रथमच हा संघ गुणतालिकेत तळाला राहिला. रोहित शर्मा याने आयपीएलमध्‍ये गमावेला फॉर्म हा आता चिंतेचा विषय ठरला आहे.

विराट कोहली : २००९ नंतर प्रथमच सरासरी २५ पेक्षा कमी

Virat Kohli

भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधारपद गमावल्‍यापासून विराट कोहलीची कामगिरी सुमारच राहिली आहे. यंदाच्‍या आयपीएलमध्‍ये तो उत्‍कृष्‍ट फलंदाजी करत आपले अस्‍तित्‍व पुन्‍हा सिद्‍ध करेल, असे मानले जात होते. मात्र रोहितबरोबरच विराट कोहली हाही फ्‍लॉप ठरला. विराटने १६ सामन्‍यांमध्‍ये सरासरी २२.७३ ने केवळ ३४१ धावा केल्‍या. २००९ नंतर प्रथमच विराट कोहलीची आयपीएलमधील धावांची सरासरी २५ पेक्षा कमी राहिली. यापूर्वी आयपीएलच्‍या सीजनमध्‍ये चार शतके ठोकणार्‍या विराटने यंदा केवळ दोन वेळाच अर्धशतकी खेळी केली. विशेष म्‍हणजे, यंदाच्‍या आयपीएलमध्‍ये तो तीन वेळा गोल्‍डन डक (पहिल्‍यास चेंडूवर बाद होणे) झाला आहे. ही त्‍याची आयपीएलमधील सर्वात निराशाजनक कामगिरी राहिली आहे. विराट कोहली पुन्‍हा फॉर्ममध्‍ये आला नाही तर त्‍याचे आगामी टी-२० विश्‍वचषक स्‍पर्धेत संघातील स्‍थान धोक्‍यात येवू शकते, असे मत क्रीडा विश्‍लेषक व्‍यक्‍त करीत आहेत.

IPL 2022 Top Flops : रवींद्र जडेजा : गोलंदाजीसह फलंदाजीतही फ्‍लॉप

Ravindra Jadeja

यंदाच्‍या सीजनमध्‍ये चेन्‍नई संघाच्‍या कर्णधारपदाची धुरा रवींद्र जडेजाकडे सोपविण्‍यात आली. मात्र त्‍याच्‍या नेतृत्‍वाखाली चेन्‍नईच्‍या संघाची कामगिरी निराशाजनक झाली. हा सीजन संपण्‍यापूर्वीच कर्णधारपद सोडण्‍याची नामुष्‍की त्‍याच्‍यावर ओढावली. यानंतर जखमी झाल्‍यामुळे तो आयपीएलमधून बाहेर पडला.
अष्‍टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा याने यंदा १० सामने खेळले. त्‍याने केवळ ११६ धावा केल्‍या. गोलंदाजीतही १० सामन्‍यात त्‍याने केवळ ५ बळी घेतले. जगातील
सर्वात्‍कृष्‍ट क्षेत्ररक्षक म्‍हणून ओळखला जाणारा जडेजा खूप सोपे झेल सोडले.

ऋषभ पंत : १४ सामन्‍यांमध्‍ये केवळ १६ षटकार

Rishabh Pant : ऋषभ पंतला ‘सेहवाग’ची उपमा!, ‘या’ माजी खेळाडूचे मोठे विधान

दिल्‍ली संघाचा कर्णधार आणि यष्‍टीरक्षक ऋषभ पंतहाही आपल्‍या नावाला साजेशी कामगिरी करण्‍यात अपयशी ठरला. १४ सामन्‍यांमध्‍ये त्‍याने सरासरी ३०.९१ने केवळ ३४० धावा केल्‍या. त्‍याला एकही अर्धशतक झळकवता आले नाही. आता दक्षिण आफ्रिका टी-२० मालिकेसाठी तो उपकर्णधार आहे. यंदाच्‍या आयपीएलमध्‍ये तो कर्णधारपदाच्‍या ओझ्‍याखाली असल्‍यासारखाच दिसला. दिल्‍लीच्‍या संघासाठीच्‍या महत्त्‍वपूर्ण सामन्‍यात त्‍याने सोपे झेल सोडले. तसेच योग्‍यवेळी डीआरएसचा वापरही त्‍याला करता आला नाही. षटकारासाठी प्रसिद्‍ध असणारा या खेळाडूने यंदाच्‍या आयपीएल स्‍पर्धेत केवळ १६ षटकार लगावले.

मोहम्‍मद सिराज : नामुष्‍कीजनक विक्रम नावावर

मागील आयपीएल स्‍पर्धेत भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्‍मद सिराज याने दमदार कामगिरी केली होती. त्‍यामुळे यंदा त्‍याला आरसीबीने ७ कोटी रुपयांना खरेदी केली होती. मात्र संघ आणि चाहत्‍यांच्‍या अपेक्षा पूर्ण करण्‍यास सिराज अपयशी ठरला.

त्‍याने १५ सामन्‍यांमध्‍ये केवळ ९ बळी घेतले. तब्‍बल ५७.११ सरासरीने धावा  दिल्‍या. आरसीबीचा हा सर्वात महागडा गोलंदाज ठरला. प्रतिषटकात त्‍याने तब्‍बल १०.७८ धावा दिल्‍या आहेत. सर्वाधिक षटकार बसलेला खेळाडू होण्‍याचा नामुष्‍कीजनक विक्रमही त्‍याच्‍या नावावर नोंदला गेला आहे. त्‍याच्‍या गोलंदाजीवर तब्‍बल ३० षटकार लगावण्‍यात आले.

आगामी टी-२० विश्‍वचषक स्‍पर्धेपूर्वी भारतीय क्रिकेटमधील दिग्‍गज खेळाडूंचे अपयश हे संघासाठी डोकेदुखीचा विषय ठरणार आहे. आता आगामी दक्षिण आफ्रिका टी 20 मालिकेत निवोदित खेळाडूंना संधी देण्‍यात आली आहे. त्‍यांनी जर या संधीचे सोने केले तर दिग्‍गज खेळाडूंची भारतीय क्रिकेट संघातील स्‍थानही धोक्‍यात येवू शकते, असे मानले जात आहे.

हेही वाचा : 

 

Back to top button