नाशिक : सिन्नरमध्ये दोडी बुद्रुक येथे कृषी विभागाचा शेतकरी मेळावा | पुढारी

नाशिक : सिन्नरमध्ये दोडी बुद्रुक येथे कृषी विभागाचा शेतकरी मेळावा

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
सोयाबीन उत्पादन घेताना आधुनिक वाणांचा वापर करून बियाणे उगवण क्षमता चाचणी, बीज प्रक्रिया, टोकण अथवा बीबीएफ यंत्राने पेरणी करावी. सरी बरंबा पद्धतीने लागवड करून सेंद्रिय खत, अवेना न्युट्रिमिक्स वापर करावा. प्रतवारी आणि पॅकेजिंग आदी बाबींचा वापर केल्यास प्रत्येक शेतकर्‍याचे सोयाबीने उत्पादन 5 क्विंटल प्रतिएकर हमखास वाढेल, असा विश्वास एकरी 25 क्विंटल उत्पादन घेतलेले डाळिंबरत्न डॉ. बी. टी. गोरे यांनी व्यक्त केला.

दोडी बुद्रुक येथे कृषी विभागाकडून शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला शेतकर्‍यांना सोयाबीन उत्पादन घेताना वापरावयाचे तंत्रज्ञान याबाबत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. ही योजना दोडी गावात समूह पद्धतीने राबविण्यात येणार असून, 10 शेतकर्‍यांचा एक गट (समूह) स्थापन करून त्यापैकी एका शेतकर्‍याची समूह प्रवर्तक म्हणून निवड करण्यात येणार असल्याचे कृषी अधिकारी अण्णासाहेब गागरे यांनी सांगितले. तसेच 10 समूहांमधून एक शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना करण्यात येईल. शेतकरी उत्पादक कंपनी आधीच कार्यरत असल्यास, त्या कंपनीला शेतकरी समूह जोडले जातील. या योजनेमध्ये फक्त उत्पादकता वाढ अपेक्षित नसून, सोयाबीन व इतर गळीत धान्य पिकांची संपूर्ण मूल्य साखळी विकसित होणे अपेक्षित आहे. उत्पादकता वाढीसाठी समूह आधारित प्रात्यक्षिकाद्वारे निविष्ठावाटप केले जाईल, यामध्ये बियाणे, खते, औषधे इत्यादींचा समावेश असेल, तर शेतकर्‍यांची क्षमता बांधणीकरिता शेतीशाळा, प्रशिक्षण, प्रक्षेत्र भेट आदी उपक्रम राबविण्यात येतील, असे गागरे यांनी स्पष्ट केले. यावेळी कृषी अधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दोडीची सोयाबीन योजनेंतर्गत निवड – राज्य पुरस्कृत सोयाबीन उत्पादकता वाढ आणि मूल्य साखळी विकास योजनेंतर्गत सिन्नर तालुक्यातील दोडी गावाची निवड करण्यात आली आहे. शेतकर्‍यांची उत्पादकता प्रगतशील शेतकर्‍यांच्या बरोबरीने आणून, मूल्य साखळी विकासाठी येती तीन वर्षे ही योजना या गावामध्ये राबविण्यात येणार आहे. यामध्ये पिकांची उत्पादकता वाढ, शेतकर्‍यांची क्षमता बांधणी, बियाणे साखळी बळकटीकरण, मूल्य साखळी विकास इत्यादी घटकांचा समावेश असणार आहे.

हेही वाचा:

Back to top button