पिंपरी: ‘पे अँड पार्क’ ऐवजी घराबाहेर वाहने लावताय? फाडावी लागणार पावती !
मिलिंद कांबळे
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरात 'पे अँड पार्क' पॉलिसी राबविली जात आहे. सध्या 85 पैकी केवळ 5 ठिकाणी त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू आहे. योजना यशस्वी झाल्यास ती संपूर्ण शहरात लागू होणार आहे. पॉलिसीनुसार घराबाहेर वाहन लावल्यास पावती फाडावी लागणार आहे. त्यामुळे ऊठसूट रस्त्यावर वाहन लावल्यास आळा बसून, वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे, असा दावा महापालिकेच्या अधिकार्यांनी केला आहे.
शहरातील नो पार्किंगमधील वाहने ताब्यात घेण्यासाठी वाहतूक पोलिसांना टोइंग व्हॅन व मनुष्यबळ उपलब्ध करून दिल्यानंतर 21 मार्च 2022 पासून पुन्हा योजना सुरू करण्यात आली. सध्या 85 पैकी केवळ 5 ठिकाणी 'पे अँड पार्क'ला प्रतिसाद आहे. ती योजना वाहतूक पोलिसांच्या मदतीने टप्प्याटप्प्याने संपूर्ण शहरात राबविली जाणार आहे. त्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. मुख्य रस्त्यावर योजना यशस्वी झाल्यानंतर दुसर्या टप्प्यात रहिवाशी भागात घराबाहेर लावलेल्या वाहनांकडूनही शुल्क घेतले जाणार आहे.
त्याला सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी मंजुरीही दिली आहे. त्यानुसार महिना, तीन महिने, सहा महिने व वर्षभरासाठी एकत्रित शुल्क आकारणीचा नियम आहे. रस्त्यावर वाहन लावण्यासाठी नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे. घर, इमारत, हाऊसिंग सोसायटी, अपार्टमेंट व बंगल्यामध्ये वाहनासाठी जागा नसलेल्या रहिवाशांना हा नवा आर्थिक भार सहन करावा लागणार आहे.
पार्किंगला रडतखडत सुरुवात
तत्कालिन आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या आग्रही भूमिकेमुळे नवीन पार्किंग पॉलिसी तयार करण्यात आली. पॉलिसीला सर्वसाधारण सभेने 2018 ला मंजुरी दिली. सप्टेंबर 2019 च्या निविदेस प्रतिसाद मिळाला नाही. सुधारित प्रस्तावाला सर्वसाधारण सभेची 22 जून 2018 मंजुरी मिळाली. ठेकेदार नेमण्यास स्थायी समितीने 3 फेब्रुवारी 2021 ला मंजुरी दिली. राजकीय पक्ष व संघटनांचा विरोध डावलून 1 जुलै 2021 पासून 'पे अॅण्ड पार्क' पॉलिसी प्रमुख 13 रस्त्यांवर 85 ठिकाणी सुरू करण्यात आली. वाहनचालकांचा कमी प्रतिसाद, वाहतुक पोलिसांकडून असहकार, काही नगरसेवकांचा विरोध, प्रशासनाची उदासीनता आदी कारणांमुळे योजना काही महिन्यातच गुंडाळण्यात आली. ती पुन्हा सुरू करण्यात आली आहे.
स्मार्ट सिटीत पार्किंग झोनची वानवा
शहराची लोकसंख्या 27 लाखांच्या वर आहे. तर, 5 लाखांहून अधिक वाहने रस्त्यावर धावतात. वाहनतळाची मोठ्या प्रमाणात अत्यावश्यकता भासत आहे. शहरात पुरेसा संख्येने वाहनतळ (पार्किंग झोन) विकसित करण्यास पालिका अपयशी ठरली आहे. शहर विकास आराखड्यात आरक्षित केलेल्या 81 पैकी केवळ 19 जागा ताब्यात येऊनही वाहनतळ विकसित झालेले नाहीत. बीआरटीच्या 4 मार्गावर वाहनतळांसाठी आरक्षित जागेतही त्या सुविधा देता आल्या नाहीत. तसेच, पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडच्या पॅन सिटी अंतर्गत स्मार्ट पार्किंगचे स्वप्न अद्याप कागदावरच आहे.
वाहनचालकांतील बेशिस्तपणा कमी होणार
योग्य ठिकाणी वाहने लागल्याने वाहतुकीस अडथळा कमी होईल. गरज असेल तरच, वाहन पार्क केले जाईल अन्यथा वाहन रस्त्यावर आणले जाणार नाही. पार्किंगची जागा लगेच मिळाल्याने वाहनचालकांना बिनदिक्कतपणे आपली कामे किंवा खरेदी करता येईल. पार्किंगमध्ये वाहन लावल्याने वाहन सुरक्षेची हमी मिळाल्याने वाहनचालक निर्धास्त होतील. परिणामी, बेशिस्तपणे कोठेही वाहन पार्क लावण्याचे तसेच, एकाच जागी धूळ खात पडलेल्या वाहनांची संख्या कमी होईल, असा दावा महापालिकेच्या अधिकार्यांनी केला आहे. धूळ खात पडलेल्या 400 पेक्षा अधिक खासगी वाहने पालिकेने आतापर्यंत जप्त केल्या आहेत.
पे अँड पार्क योजना राबविणारच : आयुक्त
झपाट्याने वाढत असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरासाठी 'पे अँड पार्क' पॉलिसी राबविण्यात येत आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांवर सध्या त्यांची अंमलबजावणी सुरू आहे. हळूहळू संपूर्ण शहरात ती योजना राबविली जाईल. त्यासाठी प्रसंगी कठोर पावले उचलली जातील. आवश्यक असल्यास मनुष्यबळ वाढविले जाईल. वाहन पार्किंगला शिस्त लावण्यासाठी आणि चालकांना हक्काचे पार्किंग उपलब्ध करून देण्यासाठी पॉलिसी उपयुक्त आहे. ती योजना रद्द केली जाणार नाही, असे महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी स्पष्ट केले. तसेच, गरजनेनुसार आवश्यक त्या ठिकाणी पार्किग झोन विकसित केले जाणार आहेत, असे त्यांनी सांगितले.