चिंचपूर पांगुळ : पुढारी वृत्तसेवा
अतिरिक्त उसाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. त्यातच आता पाथर्डी तालुक्यातील चिंचपूर पांगुळ येथील महिला शेतकर्याने उसाचा फड पेटवून दिला आहे. ऊस तोडणी कामगार एकरी दहा हजार रुपयांची मागणी करतात तर ट्रक चालक प्रति खेपेस एक हजार रुपयांची मागणी केली जात आहे.
अन्यथा ऊस तोडणी केली जात नाही. त्यामुळे संतप्त महिला शेतकर्याने दोन एकर ऊस पेटवून दिला. जेसीबीच्या सहाय्याने जळालेला ऊस बांधावर लोटून लावला आहे. परिसरातील शेतकर्यांनी मागील तीन वर्षात समाधानकारक पाऊस झाल्याने उसाची लागवड मोठ्या प्रमाणात केली. परंतु यावर्षी अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण झाल्याने शेतकर्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
चिंचपूर पांगुळ येथील शिंदूबाई पोपट बडे या महिला शेतकर्याने बोलतांना सांगितले की वृद्धेश्वर कारखान्याने मागील वर्षी ऊसतोड केली होती. त्यास बारा महिने उलटून गेले. या वर्षी ऊस घेऊन गेले नाहीत. म्हणून संतापाच्या भरात दोन एकर उसाच्या फडाला आग लावली आहे. या शेतकर्यां प्रमाणेच परिसरातील इतर शेतकर्यांची परिस्थिती अशीच आहे.
पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन टेकला आहे. साखर कारखान्यांचा गाळप हंगाम संपत आला असताना अद्याप उसाची तोडणी होण्याची शक्यता फार कमी आहे. त्यामुळे या शेतकर्यांना कारखान्याने भरीव अशी मदत करावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे.