नाशिक : 2024 ला आमदार शिवसेनेचाच : आमदार गजानन चव्हाण | पुढारी

नाशिक : 2024 ला आमदार शिवसेनेचाच : आमदार गजानन चव्हाण

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका या निवडणुकांमध्ये 80 टक्के शिवसेनेचे उमेदवार निवडून आले, तर 2024चा सिन्नर तालुक्याचे आमदार हा शिवसेनेचाच राहील, असे प्रतिपादन आमदार गजानन चव्हाण यांनी केले.

सिन्नर शहरातील शाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यमंदिरामध्ये आयोजित शिवसंपर्क अभियानात ते बोलत होते. व्यासपीठावर माजी आमदार राजाभाऊ वाजे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख दीपक खुळे, युवा नेते उदय सांगळे, माजी नगराध्यक्ष किरण डगळे, तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर गाडे, शहरप्रमुख गौरव घरटे, सोमनाथ तुपे,कल्पना रेवगडे, नगरसेवक गणेश सानप, राहुल ताजनपुरे, पिराजी पवार आदी उपस्थित होते. चव्हाण म्हणाले की, राजाभाऊ वाजे यांचा पराभव 2067 मतांनी झाला. तो झाला नसता. परंतु, मतदारयाद्या प्रसिद्ध झाल्यानंतर हरकती घेतल्या जातात, त्या वेळी त्या घेतल्या असत्या, तर पराभव झाला नसता. अधिकार्‍यांनी शिवसैनिकांचा रुद्रावतार पाहिले असता, तर त्या वेळीच 14 हजार बोगस मतदार कमी झाले असते व शिवसेनेचाच आमदार झाला असता, असे चव्हाण यांनी सांगितले. माजी आमदार वाजे यांनी, दुसर्‍याला पराभवाचा दोष न देता, आपल्यातील चुका शोधल्या पाहिजे, असे सांगितले. यश आले, तर वाटेकरी सगळेच असतात, परंतु पराभव झाला, तर वाटेकरी कोणीच नसतात. शेवटच्या माणसापर्यंत आपण कसे पोहोचू, हे पाहिले पाहिजे, असे चव्हाण यांनी सांगितले. उदय सांगळे, नगरसेवक गणेश सानप, राहुल ताजनपुरे, ज्ञानेश्वर गोडे आदींनी आगामी निवडणुकांसंदर्भात विचार प्रगट केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महामानवांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. माजी नगराध्यक्ष किरण डगळे यांनी सूत्रसंचालन केले.

‘संघर्षातून भगवा फडकेल’ – पाच वर्षांत केलेल्या कामाचे फलक हे गावोगावी लावले असते, तर मतदारांमध्ये शिवसेना या पक्षाविषयी आत्मीयता तयार झाली असती व चांगल्या मतांनी उमेदवार विजय झाला असता. जो नगरसेवक आमदार लोकांच्या हृदयात घर करतो, तो नेहमीच जिंकून येतो. पाच वर्षांत वाजे यांनी मतदारसंघात प्रचंड कामे केली पण त्याची कुठलीही जाहिरात केली नाही. त्यामुळे मतदारांमध्ये कामे दिसली नाहीत. शिवसैनिकांनी संघर्षाला तयार राहिले पाहिजे. राग आणि चीड नसानसात तयार झाली पाहिजे, ऊर्जा तयार होईल, तरच शिवसेनेचा भगवा फडकेल, असे चव्हाण यांनी सांगितले.

केवळ चार नगरसेवक उपस्थित – पक्षाचे 18 नगरसेवक असून, या कार्यक्रमाला फक्त चार नगरसेवक उपस्थित होते. आमदार चव्हाण यांनी, ही मरगळ झटकून टाका, असे ठणकावून सांगितले.

हेही वाचा:

Back to top button