कोल्हापूर : शेअर मार्केटमध्ये दुप्पट पैशाचे आमिष दाखवून कोट्यवधीचा गंडा | पुढारी

कोल्हापूर : शेअर मार्केटमध्ये दुप्पट पैशाचे आमिष दाखवून कोट्यवधीचा गंडा

शिरोळ; शरद काळे : ड्रीम मॉल शेअर मार्केट आणि अल्बा क्वाईनमध्ये दुप्पट पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवून नेज (ता. चिक्कोडी) येथील दोघा जणांनी शिरोळमधील एका विधवेसह तरुणांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला आहे.

गंडा घालणार्‍यांपैकी एकजण तालुका पंचायत समितीकडे ग्रामसेवक म्हणून सध्या कार्यरत आहे. फसवणुकीची तक्रार देण्यास गेलेल्या विधवा महिलेला पोलिस ठाण्याच्या प्रमुखांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन गुन्हा दुसर्‍या पोलिस ठाण्यात दाखल करण्याचा सल्ला दिल्याची माहिती पीडित विधवा महिलेने दिली.

ड्रीम मॉल ट्रेडिंग कंपनी बंद पडल्यामुळे कोंडिग्रेसह जयसिंगपूर, शिरोळ, मजरेवाडी, नेज, कुरुंदवाड, निमशिरगाव, कुंभोज आदी ठिकाणचे गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत. नेज येथील जुन्या चावडीजवळ वास्तव्यास असणार्‍या ड्रीम मॉल कंपनीचे संचालक व चालक सध्या कोट्यवधी रुपयांची रक्कम घेऊन फरार झाला आहे.
दरम्यान, कंपनीच्या ग्राऊंड पातळीवर लिडरशिप करणारे अन्य ग्रामसेवक, शिक्षक तसेच उद्योजकांचे धाबे दणाणले असून कोंडिग्रे गावात एकच खळबळ उडाली आहे.

गोवा पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल

लाखो रुपयांच्या रकमांच्या गुंतवणुकीचा सल्ला देणारा ट्रेडर व संचालकाला काही दिवसांपूर्वी तालुक्यातील गुंतवणूकदारांनी गोव्यामधून उचलून आणले आणि मनसोक्त धुलाई केली. दरम्यान, गोवा पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. यात दोन गुंतवणूकदारांना अटक करण्यात आली. त्यामुळे संबंधितांना सोडून देण्यात आले.

Back to top button