खाद्यतेलाच्या किमती होणार कमी ; गृहिणींना दिलासा | पुढारी

खाद्यतेलाच्या किमती होणार कमी ; गृहिणींना दिलासा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
इंधनाचे दर तसेच एलपीजी सिलिंडरवर 200 रुपये प्रतिसिलिंडर सबसिडी देण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता खाद्यतेलाच्याही किमती कमी करण्यासाठी सरकारकडून पावले उचलली जात आहेत. केंद्र सरकारने दोन वर्षांसाठी खाद्यतेलावरील कस्टम ड्यूटी रद्द करण्याची घोषणा केल्याने गगनाला भिडलेले खाद्यतेलाचे दर कमी होण्याची आशा निर्माण झाली आहे.

इंडोनेशियाने पामतेल निर्यातीवर बंदी घातल्यानंतर देशात खाद्यतेलाच्या किमती पुन्हा वाढतील की काय, अशी भीती व्यक्त केली जात होती. मात्र, इंडोनेशियाने 23 मे रोजी निर्यातबंदी उठवल्याने, सामान्यांना दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली होती. अशात केंद्र सरकारने दोन वर्षांसाठी सोयाबीन आणि सूर्यफुलाच्या तेलावरील कस्टम ड्यूटी रद्द करताना खाद्यतेलावरील कृषी, मूलभूत शुल्क आणि विकास सेसदेखील रद्द केल्याने खाद्यतेलाच्या किमती कमी होण्याची शक्यता वाढली आहे. क्रूड सोयाबीन तेल आणि क्रूड सूर्यफूल तेलावरील आर्थिक वर्षे 2022-23 आणि 2023-24 साठी दरवर्षाकाठी 20 लाख मेट्रिक टनचे आयात शुल्क रद्द करण्यात आले आहे. यासोबतच सीमा शुल्क आणि कृषी सेससह डेव्हलपमेंट सेसदेखील रद्द करण्यात आले आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून खाद्यतेलाच्या किमती प्रचंड वाढल्याने, सर्वसामान्यांचे बजेट पूर्णत: कोलमडले होते. त्यामुळे सरकारने दर नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी केली जात आहे.

तुरीचे अधिक उत्पादन
डाळींचे दर वाढल्याने ते नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत, अशी मागणी होत होती. सरकारने ठोक व्यापार्‍यांना त्यांच्याकडे शिल्लक असलेला डाळीचा साठा तसेच विक्री झालेल्या डाळीचा साठा सरकारला कळविणे बंधनकारक करण्यात आले होते. त्याचप्रमाणे डाळ आयात करण्याचादेखील निर्णय घेण्यात आला होता. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही देशात आणि राज्यात तुरीचे उत्पादन वाढल्याने, दर स्थिर राहण्याची शक्यता आहे.

साखरेचे दर वाढू नये याकरिता केंद्र सरकारने 100 लाख मेट्रिक साखर निर्यात करण्याची परवानगी दिली आहे. त्यापुढे निर्यात करायची असेल तर केंद्र सरकारची परवानगी घ्यावी लागणार. सरकारच्या या निर्णयामुळे साखरेचे दर स्थिर राहतील यात शंका नाही. खाद्यतेलाबाबत सरकारने घेतलेला निर्णय दर कमी करण्यास फायदेशीर ठरेल.
– राकेश भंडारी, सचिव,
धान्य किराणा व्यापारी संघटना

प्रकार           15 लिटर दर          किलोचे दर
सोयाबीन      2,600 ते 2,700      180
पामतेल        2,550 ते 2,650      176
शेंगदाणा      2,800 ते 2,975       198
सूर्यफूल       2,775-2,850           208
सरकी तेल    2,550 ते 2,675        178
सरसो तेल    2,600 ते 2,900         193
डालडा तूप    2,550 ते 2,750         183

हेही वाचा :

Back to top button