चक्क समुद्राच्या पाण्याखाली शेती! | पुढारी

चक्क समुद्राच्या पाण्याखाली शेती!

रोम : माणूस सध्या अंतराळातही शेती करण्याचा प्रयत्न करीत आहे. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर विविध पिके घेण्याचे प्रयोग सातत्याने सुरू असतात. तसेच अलीकडेच चंद्रावरून आणलेल्या मातीतही रोप विकसित करण्यात संशोधकांना यश आले होते. अशा स्थितीत या पृथ्वीतलावरच सर्व ठिकाणी शेतीचा प्रयोग करण्याचा प्रयत्न होणेही साहजिकच आहे. इटलीतील नोली येथे भूमध्य समुद्राच्या पृष्ठभागापासून तब्बल 15 फूट खोलीवर एक अनोखी शेती केली जात आहे. भाजीपाल्याच्या या बागेला ‘निमोस गार्डन’ असे नाव देण्यात आले असून सर्जिओ गॅम्बेरिनी हा माणूस या बागेचा मालक आहे.

समुद्रतळाशी एक हवाबंद बायोस्फीअर उभा करून त्यामध्ये ही शेती केली जाते. या बागेतील सहा अ‍ॅक्रेलिक बायोम्स समुद्रसपाटीपासून खाली जमिनीवर साखळदंडाने बांधलेले आहेत आणि दोन हजार लिटर हवा यामध्ये धारण केली जाते. या बायोम्समध्ये 90 रोपे आहेत. समुद्राचे पाणी घनीभूत होऊन या वनस्पतींवर पडते. त्यामुळे त्यांना योग्य ते पोषण मिळते. या बागेत पिकवलेल्या भाज्यांमध्ये अधिक पोषक तत्त्वे आढळून आली आहेत. या अनोख्या शेतीसाठी सुमारे 18 कोटी रुपये खर्च आला आहे.

Back to top button