नाशिक : शहरात बस पासेससाठी केंद्रे उघडणार | पुढारी

नाशिक : शहरात बस पासेससाठी केंद्रे उघडणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
आणखी 15 दिवसांनी सर्वच शाळा-महाविद्यालये सुरू होणार असल्याने विद्यार्थ्यांच्या सोयीकरिता नाशिक महानगर परिवहन महामंडळ अर्थात सिटीलिंकतर्फे शहरात 18 ठिकाणी बस पासेस उपलब्ध होण्याकरिता केंद्रे उघडली जाणार आहेत.

मनपा आयुक्त तथा महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष रमेश पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या आढावा बैठकीत सिटीलिंक शहर बसेसच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. त्यात बस पासेस केंद्रांबद्दलची माहिती देण्यात आली. येत्या 13 जूनपासून शहरातील सर्वच माध्यमिक आणि प्राथमिक शाळा सुरू होत आहेत. यामुळे या विद्यार्थ्यांकडून विद्यालयात येण्या जाण्यासाठी बसेसचा वापर केला जात असल्याने त्यांना सवलतीत पासेस उपलब्ध व्हावे, याकरिता नाशिक शहरात महानगर परिवहन महामंडळ 18 ठिकाणी बस पासेसचे केंद्रे उघडणार आहेत. सध्या चार ठिकाणी पासेस केंद्र असून, त्यात आणखी 14 ठिकाणांची भर पडणार आहे. सिटीलिंककडून विद्यार्थ्यांना 50 टक्के सवलतीत पासेस उपलब्ध करून दिली जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून शहर बसेसला चांगला प्रतिसाद असून, शाळा सुरू झाल्यानंतर त्यात आणखी भर पडणार असल्याचे महामंडळाने कळविले आहे.

जादा बसेसचे नियोजन
शाळा, कॉलेज पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर काही मार्गांमध्ये बदल करून शाळा-महाविद्यालयांच्या मार्गांवर शाळेच्या कालावधीत जादा बसेस सुरू करण्याचे महामंडळाचे नियोजन आहे. असे झाल्यास विद्यार्थ्यांना बसेसची सोय उपलब्ध होईल शिवाय महामंडळाच्या उत्पन्नातही भर पडण्यास मदत होणार आहे.

हेही वाचा :

Back to top button