चिपळूण : पुढारी वृत्तसेवा
येत्या पावसाळ्यात परशुराम घाटाच्या दुरुस्तीच्या कामानंतर सुरक्षेबाबत कोणतीही हमी देता येत नाही. त्यामुळे घाटातील वरच्या भागातील 11 आणि खालच्या भागातील 60 अशा एकूण 71 स्थलांतराची तयारी ठेवण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला दिल्या आहेत. त्या अनुषंगाने निवारा केंद्र उभारून त्या कुटुंबाना पूर्ण व्यवस्था करण्याचा दि. 23 रोजी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोर्हे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
मुंबई – गोवा महामार्गावरील परशुराम घाट अतिशय धोकादायक बनला होता. वारंवार दरड कोसळून वाहतूक खोळंबा होत होता. येत्या पावसाळ्यामध्ये ते अतिशय धोकादायक ठरू शकते. त्यामुळे परशुराम घाटाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. घाटाच्या वरच्या भागातील दरडी कधीही घसरण्याची शक्यता होती. हा धोका कमी करण्यासाठी दरडी हटवण्याचे काम हाती घेऊन चौपदरीकरण करण्याचे काम सुरू केले. कल्याण टोल व ईगल इन्फ्राच्यावतीने हे काम सुरू करण्यात आले.
परशुराम घाट दररोज सहा तास बंद ठेवून या कामाला गती देण्याचा प्रयत्न झाला. मात्र, ईगलकडून फारशी गती मिळाली नाही. त्यामुळे घाटाच्या खालील लोकांना धोका संभवतो आहे. त्या दृष्टीने शासन तात्पुरत्या पुनर्वसनासाठी प्रयत्न करीत आहे. संबंधित ठेकेदारांना तात्पुरत्या निवारा शेड उभारण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या ठिकाणी दरडग्रस्त लोकांची व्यवस्था होणार आहे. त्यामुळे परशुराम घाटाच्या दोन्ही बाजूकडील 71 कुटुंबांच्या तात्पुरत्या स्थलांतराचा प्रश्न निर्माण झाला असून प्रशासन त्यावर कसा तोडगा काढते हे महत्त्वपूर्ण ठरणार आहे.