सातपूर : पुढारी वृत्तसेवा
येथील अशोकनगर बसथांब्याशेजारी ज्येष्ठ नागरिकांसाठी बनवण्यात आलेल्या ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रावर अशोकनगर रोड परिसरात हातविक्री करणार्या व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे. विरंगुळा केंद्रामध्ये चक्क रस्त्यावर विक्री करण्यात येणार्या वस्तूंचा साठा करून त्याचा गोदामासारखा वापर सुरू केला आहे. विशेषत: या विरंगुळा केंद्राला कुलूप लावून चावीदेखील या हातगाडी विक्रेत्यांकडे असते.
अशोकनगर भागात ज्येष्ठ नागरिक वेळ घालविण्यासाठी ते अशोकनगर बसथांबा व इतर ठिकाणी बसत असल्याचे दिसून येत होते. त्यामुळे प्रभाग क्रमांक 10 च्या माजी नगरसेविका माधुरी बोलकर व इंदूबाई नागरे यांनी पुढाकार घेऊन दोन वर्षांपूर्वी अशोकनगर रोडलगत या नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र बांधून सुरू केले. या ठिकाणी या नागरिकांना वाचण्यासाठी सर्व वृत्तपत्रे, पुस्तके आदी एका वाचनालयातर्फे ठेवण्यात आली होती. यामुळे परिसरातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने या ठिकाणी येत होते. परंतु नाशिक मनपाने सदर चालकास जादा भाडे आकारणी केल्याने त्याने या ठिकाणचे वाचनालय बंद केले. त्यानंतर हे विरंगुळा केंद्र धूळ खात पडून असल्याने त्याचा वापर आता हातविक्रेते गोदाम म्हणून करीत आहेत. आतील वस्तू दिसू नाही म्हणून पडदा लावून झाकून ठेवण्यात आल्या आहेत. याकडे सातपूर विभागीय कार्यालयामधील अधिकारी, अतिक्रमण विभागाचे दुर्लक्ष झालेले दिसून येत असून, ही वास्तू उभारण्यासाठी नाशिक मनपाने लाखो रुपये खर्च केले आहे. मनपा प्रशासनाने या विरंगुळा केंद्र व बाहेरील अतिक्रमण हटवून केंद्र पुन्हा ज्येष्ठ नागिरकांसाठी सुरू करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.