मसल्स बनवण्यासाठी ‘ही’ जीवनसत्त्वे आहेत महत्वाची, जाणून घ्या अधिक | पुढारी

मसल्स बनवण्यासाठी 'ही' जीवनसत्त्वे आहेत महत्वाची, जाणून घ्या अधिक

स्नायूंना व्यायाम मिळणे हे त्यांच्या आरोग्याच्या द़ृष्टीने खूप महत्त्वाचे असते. चालणे, धावणे इत्यादी व्यायामापासून ते अगदी लिहिणे, टाईप करणे इत्यादी छोट्या छोट्या व्यायामांमुळे स्नायूंना व्यायाम मिळतो.

स्नायूंना पुरेसा व्यायाम मिळाल्यामुळे ते मजबूत तर होतातच; पण कोलेस्टेरॉल जळून वजनवाढीची समस्याही राहत नाही. शरीरातील स्नायूंच्या मजबुतीसाठी व पुष्टीसाठीही योग्य प्रमाणात प्रथिने व जीवनसत्त्वे यांचे सेवन करणे महत्त्वाचे आहे. संतुलित आहारासोबतच योग्य प्रमाणात व्यायाम आवश्यक आहे. अनेक प्रथिने व जीवनसत्त्वे ही स्नायूंच्या विकासासाठी आवश्यक असतात. जीवनसत्त्वांमध्ये खास करून ब-1, ब-2, ब-3 इत्यादी जीवनसत्त्वे स्नायूंच्या विकासासाठी आवश्यक असतात. अनेक फळे, भाज्या व मांस यातून जीवनसत्त्वे मिळतात. मसल्स बनवण्यासाठी आवश्यक अशा जीवनसत्त्वांची माहिती घेऊ.

ब-1 जीवनसत्त्व : मसल्स बनवण्यासाठी ब-1 या जीवनसत्त्वाचा खूप मोठा वाटा असतो. या जीवनसत्त्वामुळे कर्बोदके व पौष्टिक तत्त्वांचे ऊर्जेत रूपांतर होते.

ब-2 जीवनसत्त्व : हे आणखी एक महत्त्वाचे जीवनसत्त्व आहे. या जीवनसत्त्वाला रायबोफ्लेविन असेही म्हणतात. प्रथिने, कार्बोदके व मेद यांचा अतिरिक्त प्रभाव कमी करण्याचे काम हे जीवनसत्त्व करते. स्नायूंच्या विकासात या जीवनसत्त्वांचा खूप मोठा वाटा असतो. दुधात हे जीवनसत्त्व मोठ्या प्रमाणावर असते.

ब-3 जीवनसत्त्व : ऊर्जा निर्माण व मज्जासंस्था मजबूत ठेवण्यासाठी हे जीवनसत्त्व खूप उपयुक्त आहे. शिवाय या जीवनसत्त्वामुळे आपली पचनसंस्था निरोगी राहण्यास मदत होते. चिकन हे या जीवनसत्त्वाचा महत्त्वाचा स्रोत आहे.
क जीवनसत्त्व : क जीवनसत्त्व हे आपल्या शरीरातील उतींचे रक्षण करण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. या जीवनसत्त्वामुळे आपली रोगप्रतिकारकशक्ती वाढते. भोंगी मिर्ची, कोबी, पपई हे क जीवनसत्त्वाचे स्रोत आहेत.

बायोटिन : बायोटिनमुळे आपले शरीर उपलब्ध पौष्टिक तत्त्वांचा नीट वापर करू शकते. त्याचबरोबर तांबड्या रक्तपेशी वाढण्यासही मदत होते.

फॉलिक अ‍ॅसिड : फॉलिक अ‍ॅसिडमुळे शरीरात नवीन पेशी निर्माण होण्यास मदत होते. एक कप मसूर डाळीमुळे दिवसभरासाठी आवश्यक फॉलिक अ‍ॅसिड मिळते.

अ जीवनसत्त्व : अ जीवनसत्त्वाला रेटिनल या नावानेही ओळखले जाते. अ जीवनसत्त्वामुळे डोळे निरोगी राहण्यास मदत होते. गाजर, पालक इत्यादी अ जीवनसत्त्वाचे स्रोत आहेत.

ड जीवनसत्त्व : ड जीवनसत्त्वाला सनशाईन जीवनसत्त्व असेही म्हणतात. सूर्यकिरण हे या जीवनसत्त्वाचा महत्त्वाचा स्रोत आहेत. याशिवाय दूध, अंडी, झिंगे हे ड जीवनसत्त्वाचे स्रोत आहेत.

आजकाल व्यायाम करून मसल्स बनवण्याची आवड वाढत चालली आहे. पण मसल्स कमावण्यासाठी व्यायामासोबतच योग्य आहाराचीही गरज असते.

-डॉ. संजय गायकवाड

Back to top button