पोलिस महासंचालक संजय पांडे : पोलिस उपनिरीक्षकांना चार पदोन्नती द्याव्यात | पुढारी

पोलिस महासंचालक संजय पांडे : पोलिस उपनिरीक्षकांना चार पदोन्नती द्याव्यात

नाशिक; पुढारी वृत्तसेवा : पोलीस दलात उपनिरीक्षक पदावर भरती झालेल्या अधिकाऱ्यांना चार पदोन्नती दिल्यास त्यांचे मनोबल वाढेल व कामात सुधारणा होईल. सध्या पोलिस उपनिरीक्षकांना सहायक व पोलिस निरीक्षकपदापर्यंत बढती मिळत आहे. उपनिरीक्षकांना चार पदोन्नतीसह इतर मागण्या राज्याचे पोलिस महासंचालक संजय पांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे केल्या.

त्र्यंबकरोडवरील महाराष्ट्र पोलीस अकादमी येथील विविध प्रकल्पांचे उद्घाटन केल्यानंतर पांडे बोलत होते. पांडे यांनी सांगितले की, पोलिस दलातील प्रशिक्षक व प्रशिक्षणार्थींना अनेक अडचणी येत असतात.

त्याचप्रमाणे पोलीस उपनिरीक्षकांना चार बढत्या दिल्यास त्यांचे मनोबल उंचावेल व त्याचे सकारात्मक परिणाम कामावर दिसतील.

पोलीस अधिकाऱ्यांना ‘ए’ ग्रेडमध्ये २४ टक्के व कर्मचाऱ्यांना ‘बी’ ग्रेडमध्ये १२ टक्के भत्ता मिळतो. मात्र पोलिस कर्मचाऱ्यांना जास्त भत्ता दिला पाहिजे, तसेच ग्रेड नको असल्याचेही मत त्यांनी व्यक्त केले.

पोलिस दलातील खेळाडूंना प्राेत्साहन देण्यासाठी एक टप्पा पदोन्नती देण्याची पद्धत पुन्हा सुरु केली पाहिजे असेही मत त्यांनी व्यक्त केले.

अकादमीच्या संरक्षक भिंतीची उंची वाढवण्यासाठी आर्थिक मदत देण्याची मागणी त्यांनी केली.

प्रशिक्षण व खास पथके विभागाचे अपर पोलीस महासंचालक संजय कुमार यांनीही प्रास्ताविक करताना विविध मागण्या केल्या.

त्यात प्रशिक्षणार्थी पोलिसांना वैद्यकीय खर्चाचे पैसे मिळण्याची मागणी केली.

प्रशिक्षणात शारिरीक व्यायामावर जोर असतो. त्यामुळे अनेकदा दुखापत होतात. तसेच कोरोना काळातही १६५ प्रशिक्षणार्थी कोरोनाबाधित झाल्याने त्यांना लाखाे रुपयांचा खर्च करावा लागला. त्यामुळे त्यांना वैद्यकीय खर्च मिळावा.

तसेच अकादमीत तज्ञ प्रशिक्षक बोलवावे लागतात. त्यासाठी ८ कोटींपैकी मागील वर्षी २५ लाख व चालू वर्षी ८० लाख रुपये मिळाले.

यात २ कोटी रुपयांपर्यंत वाढ केल्यास प्रशिक्षणात वाढ करता येईल असेही संजय कुमार यांनी सांगत आर्थिक मदतीची मागणी केली.

गृहमंत्र्यांची भेट होते की नाही?

पोलिस महासंचालक संजय पांडे व अपर पोलिस महासंचालक संजय कुमार यांनी केलेल्या मागण्यानंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले की, तुमचे भाषण ऐकल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांना वाटेल की, तुमची गृहमंत्र्यांसोबत भेट होते की नाही.

मात्र व्यासपीठ ही मागण्याची संधी असते. मागण्यांचा सकारात्मक विचार करण्याचेही आश्वासन वळसे पाटील यांनी दिले.

हे ही वाचलं का?

Back to top button