नाशिक : दिंडोरी चौफुलीवरील वाहतूक कोंडीची समस्या कायम | पुढारी

नाशिक : दिंडोरी चौफुलीवरील वाहतूक कोंडीची समस्या कायम

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा : 
येथील ग्रामीण रुग्णालय ते संस्कृती लॉन्सपर्यंत होणार्‍या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्ता रुंदीकरण करण्यात आले असले वाहनधारकांकडून रस्त्याच्या कडेलाच वाहन पार्क केली जात असल्याने दिंडोरी चौफुलीवरील वाहतूक कोंडीची समस्या कायम आहे. त्यामुळे बेशिस्त वाहनधारकांवर कारवाई करून येथील वाहतूक कोंडी सोडविण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

या मागार्वर बँका, कृषी, कपड्यांची दुकाने, हॉटेल व किरकोळ विक्रेते आदी व्यवसायाची दुकाने तसेच कार्यालये असल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. मात्र, येणार्‍या नागरिकांकडून येथे रस्त्याच्या कडेला लागूनच वाहने पार्क केली जात असल्याने रस्त्याने येजा करणार्‍या वाहनांना अडथळा निर्माण होत आहे. काही दिवसांपूर्वीच येथील या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले आहे. मात्र, रुंदीकरण होऊनही शिस्तीअभावी येथील वाहतूक कोंडीवर कोणताही फरक पडलेला दिसत नाही. रुंदीकरणामुळे रस्त्यावरून जाताना दोन वाहने एका दिशेने पार होतील, अशी अपेक्षा होती. मात्र, ती फोल ठरली आहे. नाशिककडून वणीकडे जाणारा रस्ता तसेच स्वामी समर्थ केंद्राकडे जाणारा रस्ता, पालखेड धरण व शिर्डीला जाणारा जवळचा रस्ता असे महत्त्वाच्या रस्त्यांना जोडणारी ही चौफुली आहे. त्यामुळे येथे वाहनांची मोठी वर्दळ असते. मात्र, येथील वाहतूक कोंडीकडे कोणीच लक्ष देण्यास तयार नसल्याने वाहनधारकांचा तासन्तास खोळंबा होत आहे. या ठिकाणी वाहनांच्या लागणार्‍या रांगा वाहनधारकांसह आजूबाजूच्या दुकानदारांसाठी त्रासदायक ठरत आहेत.

दिंडोरी नगरपंचायतीने या ठिकाणी ट्रॅफिक झोन घोषित करून ग्रामीण रुग्णालय ते संस्कृती लॉन्सपर्यंत नो पार्किंग झोन तयार करण्याची गरज आहे. त्यासाठी वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनाही लक्ष देण्याची गरज आहे. पे अ‍ॅण्ड पार्क याप्रमाणे वाहने लावण्याची सोय उपलब्ध करून द्यावी. – सचिन देशमुख, माजी उनगराध्यक्ष, नगरपंचायत, दिंडोरी

रुग्णवाहिकेला वाट काढणे कठीण – वाहतूक कोंडीदरम्यान एखादी रुग्णवाहिका आली तर तिला गर्दीतून वाट काढणे कठीण होऊन जाते. त्यामुळे अशा वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकली तर रुग्णाच्या जिवाला धोका होऊ शकतो. त्यामुळे या चौफुलीवरील वाहतूक कोंडी सुरळीत करण्याची गरज आहे.

हेही वाचा:

Back to top button