पोलिसांपुढे आव्हान गुन्हेगारी रोखण्याचे | पुढारी

पोलिसांपुढे आव्हान गुन्हेगारी रोखण्याचे

नाशिक : गौरव अहिरे

एकीकडे 24 तासांत लाच मागितल्या व लाच घेतल्याप्रकरणी महिला पोलिस अधिकारी व दोन अंमलदार लाचलुचपत प्रतिबंधकच्या जाळ्यात आले तर दुसरीकडे काही तासांत पाच खुनांसह, चोरी, जबरीचोरी, घरफोडीचे प्रकार घडल्याने शहरातील पोलिस यंत्रणेविषयी नागरिकांमध्ये संतापासह नाराजीचे वातावरण पसरले आहे. नागरिकांमधील पोलिसांची प्रतिमा मलीन होत असून, यावर अंकुश ठेवून नागरिक व पोलिसांमधील नाते दृढ करणे गरजेचे आहे.

काही दिवसांपूर्वी टवाळखोरांची तक्रार देण्यासाठी गेलेल्या व्यक्तीस पोलिस चौकीतच मद्यसेवन करणार्‍या पोलिसांनी मारहाण केल्याची घटना घडली होती. त्यामुळे पोलिसांकडून नागरिकांना मिळणार्‍या वागणुकीचा प्रश्न ऐरणीवर आला होता. वाहनचोरी, मोबाइल चोरी झाल्यानंतर त्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करणार्‍या पोलिसांचा मुद्दा कायम चर्चेत असतो. चोरी, घरफोडी, जबरी चोरी, वाहनचोरीचे गुन्हे नित्याचेच झाले असून, त्यापैकी मोजकेच गुन्हे उघडकीस येत असल्याने नागरिकांची कोट्यवधी रुपयांची मालमत्ता चोरट्यांच्याच ताब्यात आहे. यातच आता गंभीर गुन्ह्यांमधील आरोपींना मदत करण्याच्या मोबदल्यात लाचेची मागणी करणार्‍या व लाच घेणार्‍या तिघा पोलिसांना पकडल्यानंतर सर्वसामान्यांना न्याय देणार कोण असा प्रश्न उपस्थित झाला आहे. लाचखोरीच्या घटनांना काही तास उलटत नाही तोच शहरात एकापाठोपाठ चार जणांचा खून झाल्याचे उघड झाले. त्या जोडीला चोरी, घरफोडी, जबरी चोरीसारखे गुन्हेही घडले. त्यामुळे पोलिसांचा वावर सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी आहे की त्यांना वार्‍यावर सोडण्यासाठी आहे असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे.

या महिन्यात शहरातील दोन खून कौटुंबिक कारणातून झाले तर तीन क्षणीक कारणांमधून झाले. यातील एका विद्यार्थ्याचा खून करताना मारेकर्‍यांनी सोशल मीडियावर लाइव्ह चित्रीकरण केल्याचे समोर येत आहे, तर एका प्रकरणात किरकोळ कारणावरून घरी जाणार्‍या व्यक्तीस धारदार शस्त्राने भोसकून खून करीत मारेकरी पसार झाले. पोलिसांनी खुनांमधील संशयित आरोपींना पकडले आहेत. पकडलेले संशयित सराईत गुन्हेगार नसले तरी त्यांना कोणताच धाक नसल्याचेही केलेल्या गुन्ह्यांवरून दिसते. पोलिसांचा धाक नसल्याने गुन्हेगारांना कायद्याची भीती नसल्याचे दिसते. गुन्हा केल्यानंतर काही दिवसांत बाहेर येऊ असा विश्वास गुन्हेगारांमध्ये वाढत असल्याने ते गुन्हे करताना कोणताही विचार करत नसल्याचे दिसते. त्यामुळे गुन्हेगारांना कठोर शिक्षा होण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न वाढवणे गरजेचे असून, गुन्हेगारांकडूनच लाच घेऊन त्यांच्या सोयीने तपास करण्याचा ट्रेंड वाढल्यास पीडित व्यक्तींचा पोलिस व न्यायव्यवस्थेवरील विश्वास उडण्याची भीती आहे. त्यामुळे पोलिसांना त्यांच्या सकारात्मक व नागरिकस्नेही कामातून नागरिकांचा विश्वास जिंकणे गरजेचे आहे.

हेही वाचा :

Back to top button