बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकला गंभीर जखमी; पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू | पुढारी

बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकला गंभीर जखमी; पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू

कोरेगाव भीमा/तळेगाव ढमढेरे : पुढारी वृत्तसेवा

वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथे बिबट्याच्या हल्ल्यात वरद नितीन शिवले हा तीन वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वढू बुद्रुक येथील गावखरीमळा येथील गोठ्याशेजारी शुक्रवारी (दि. 20) रात्री 8.30 वाजेच्या सुमारास वरद नितीन शिवले हा खेळत होता. वरद अचानक दिसेनासा झाल्याने आरडाओरडा झाल्याचे पाहत संतोष शिवले व अर्जुन शिवले यांनी आजूबाजूच्या परिसरात वरदला शोधण्यास सुरुवात केली.

तेवढ्यात शेजारील उसाच्या शेतातून बिबट्याच्या डरकाळीचा आवाज आल्याने तेथे संतोष शिवले व ग्रामस्थांनी धाव घेतली. ग्रामस्थांच्या आवाजामुळे बिबट्याने तेथून पळ काढला. तेथे वरद शिवले जखमी अवस्थेत पडल्याचे दिसून आले. त्यास उपचारांसाठी प्रथम वाघोली आणि तेथे प्रथमोपचार देऊन पुढील उपचारांसाठी पुण्यातील रुग्णालयात पाठविण्यात आले. दरम्यान, ही घटना समजताच वन विभागाने शनिवारी (दि. 21) सकाळीच वढू बुद्रुक येथे पिंजरा लावून बिबट्याला आळा घालण्याचे प्रयत्न सुरू केल्याचे माजी सरपंच अंकुश शिवले यांनी सांगितले.

परिसरात भीतीचे वातावरण

यापूर्वीही वढू बुद्रुक, वाजेवाडी तसेच आजूबाजूच्या परिसरातही बिबट्याने अनेकांवर जीवघेणा हल्ला केला आहे. अनेक पाळीव प्राण्यांचा फडशा पाडला, तर ठिकठिकाणी बिबट्यांची पिले आढळून येत आहेत. यामुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली आहे. शेतातील कामांसाठी एकट्याने जाणे टाळले जात आहे. वन विभागाने लवकरात लवकर बिबट्यांचा बंदोबस्त करावा, अशी ग्रामस्थांकडून मागणी होत आहे.

वन विभागाने लावले तीन पिंजरे

वढू बुद्रुक येथील नागरिकांवर मागील काही दिवसांपूर्वी बिबट्याकडून हल्ला झाला होता. त्या वेळी नागरिकांनी स्वतःचा बचाव करीत आपले प्राण वाचविले होते. आता लहान तीन वर्षांच्या बालकावर हल्ला झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वन विभागाच्या वतीने वढू बुद्रुक येथील तीन ठिकाणी पिंजरे लावले आहेत.

बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या बालकाची तब्येत स्थिरावत असून, शासनाकडून वैद्यकीय मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. वढू बुद्रुक येथे तीन पिंजरे लावण्यात आले असून, नागरिकांच्या सुरक्षिततेची काळजी घेण्यात येत आहे.
                                              -पी. ए. क्षीरसागर, वन परिमंडळ अधिकारी

हेही वाचा :

Back to top button