नाशिक : पांडवलेणीच्या माथ्यावर भडकली आग, साडेतीन तासांच्या प्रयत्नांनतर नियंत्रण | पुढारी

नाशिक : पांडवलेणीच्या माथ्यावर भडकली आग, साडेतीन तासांच्या प्रयत्नांनतर नियंत्रण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहरालगत असलेल्या डोंगर परिसरात वणव्याच्या घटना काही केल्या कमी होत नसल्याचे चित्र आहे. मंगळवारी (दि.17) रात्री मुंबई-आग्रा महामार्गावरील पांडवलेणीच्या माथ्यावर आग भडकली होती. उन्हामुळे गवत पूर्णत: वाळलेले असल्याने आगीने काही क्षणातच रौद्ररूप धारण केले. महाराष्ट्र वनविकास महामंडळाच्या (एफडीसीएम) पथकाने साडेतीन तासांच्या अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. मात्र, तोपर्यंत 1.5 हेक्टरवरील गवत जळून खाक झाले.

गेल्या महिन्यामध्ये ब्रम्हगिरी, मोरधन, रामशेज किल्ला, हरसूल घाट, मायना डोंगर, मातोरी गायरान, पांजरपोळ, संतोषा (बेळगाव ढगा), मातोरी येथील सुळा डोंगर आदी परिसराची अनैसर्गिक वणव्यांमुळे अक्षरश: राख झाली आहे. आता त्यात पांडवलेणीची भर पडली आहे. पंडित जवाहरलाल नेहरू वनोद्यानाजवळील राखीव वनातील कक्ष क्रमांक 225 येथे आग लागल्याचे धुरामुळे लक्षात आले. घटनेची माहिती मिळताच एफडीसीएम पथकाने घटनास्थळी धाव घेत स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने झोडपणीच्या (झाडांच्या फांद्या) सहाय्याने आग विझविण्यास सुरुवात केली.

पांडवलेणीच्या माथ्यावर वार्‍याच्या वेगामुळे आग आजूबाजूला पसरली. एफडीसीएमचे वनपरिक्षेत्र अधिकारी दीपक बोरसे, वनपरिमंडल अधिकारी राहुल वाघ, वनरक्षक संदीप आठरे, वनसेवक मानसिंग गावित, भामट्या ठाकरे, अजित मकरानी आदींनी साडेतीन तास शर्त करून आगीवर नियंत्रण मिळविले.

हेही वाचा :

Back to top button