कोल्हापूर : अस्सल हापूस आजपासून मिळणार माफक दरात | पुढारी

कोल्हापूर : अस्सल हापूस आजपासून मिळणार माफक दरात

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्व अंतर्गत शाहू मिल येथे उद्या गुरूवार दि. 19 पासून चार दिवस आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात अस्सल हापूस माफक दरात उपलब्ध होणार आहे. या महोत्सवात रानमेव्यासह कृषि उत्पादनेही उपलब्ध होणार आहेत. सकाळी नऊ ते रात्री नऊ या कालावधीत हा महोत्सव सुरू राहणार आहे.

उत्पादक ते ग्राहक थेट विक्री योजने अंतर्गत महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ कोल्हापूर व कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने हा अंबा महोत्सव होत आहे. या महोत्सवात अस्सल हापूससह केशरी, रायवळ, पायरी आंबे माफक दरात देण्यात येणार आहेत.

या महोत्सवादरम्यान रानमेवा आणि शेती उत्पादने महोत्सवही होणार आहे. त्यात आजरा घनसाळ, पॉलिश्ड व हातसडी तांदूळ, कोल्हापूरचा सेंद्रिय गूळ, सेंद्रिय नाचणी, सेंद्रिय हळद, बांबूपासून तयार केलेली उत्पादने, सेंद्रिय ताजी फळे व ताजा विषमुक्त भाजीपाला आदींसह जांभूळ, करवंदे, फणस आदी रानमेव्यांचा आस्वाद नागरिकांना घेता येणार आहे. घोंगडी बनविणे, चप्पल बनविणे, मिठाई बनविणे, कुंभारकाम, बांबू उद्योग, बुरूड कामा आदींची उत्पादनेही प्रदर्शनात विक्रीसाठी उपलब्ध राहणार आहेत.

Back to top button