कोल्हापूर : केंद्रीय माहिती आयुक्त उदय माहूरकर यांचे उद्या व्याख्यान | पुढारी

कोल्हापूर : केंद्रीय माहिती आयुक्त उदय माहूरकर यांचे उद्या व्याख्यान

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : शिवाजी विद्यापीठाच्या वतीने आयोजित केलेल्या ‘पुढारी’कार पद्मश्री कै. डॉ. ग. गो. जाधव स्मृती व्याख्यानमालेत भारत सरकारचे केंद्रीय माहिती आयुक्त उदय माहूरकर यांचे शुक्रवारी (दि.20) सायंकाळी 5 वाजता राजर्षी शाहू स्मारक भवन, दसरा चौक येथे व्याख्यान होणार आहे. ‘भारत एक जागतिक महासत्ता’ या विषयावर ते पुष्प गुंफणार आहेत. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के अध्यक्षस्थान भूषविणार असून, प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील प्रमुख उपस्थित असणार आहेत. या व्याख्यानाचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन शिवाजी विद्यापीठाने केले आहे.

उदय माहूरकर हे सध्या केंद्रीय माहिती आयुक्त म्हणून नवी दिल्लीत काम पाहत आहेत. केंद्रीय माहिती अधिकार न्यायालयाचे ते न्यायमूर्ती आहेत. केंद्रीय माहिती आयोग असे त्याला म्हटले जाते. विशेष म्हणजे माहूरकर हे प्रख्यात लेखकही आहेत. केंद्रीय माहिती आयुक्तपदावर येण्यापूर्वी गेली 33 वर्षे त्यांनी ‘इंडिया टुडे’ या नामांकित मासिकाचे राजकीय विश्लेषक म्हणून विशेष भूमिका बजावली आहे.

राजकीय विश्लेषक या नात्याने 2008 ते 2010 या कालावधीत ‘इंडिया टुडे’मध्ये लिखाण करीत असताना त्यांनी स्वतःचा वाचकवर्ग निर्माण केला. अचूक राजकीय विश्लेषक असा त्यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला जातो. त्यांनीच पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी येणार, असे विश्लेषण केले होते आणि ते अचूकही ठरले.माहूरकर यांची तीन पुस्तके देशभर आणि परदेशातही वाचकांच्या लौकिकास पात्र ठरली आहेत. यामध्ये दोन पुस्तके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर असून, ‘मोदींचे प्रशासनाचे मॉडेल’ हे पुस्तक प्रसिद्ध आहे. नरेंद्र मोदी यांच्या प्रशासनाचे गमक जाणून घेण्यासाठी हे पुस्तक सर्वत्र प्रसिद्ध आहे.

स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्यावरील त्यांचे प्रसिद्ध झालेले पुस्तक सर्वत्र चर्चेचा विषय ठरले. या पुस्तकात त्यांनी सावरकरांविषयी एका वेेगळ्या पैलूवर प्रकाशझोत टाकला आहे. ‘भारताची फाळणी रोखणे आणि राष्ट्रीय सुरक्षा दृष्टिकोन’ या विषयावर या पुस्तकात भर देण्यात आला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनीही या पुस्तकाचा मुक्तकंठाने गौरव केला आहे.
पहिल्या फाळणीपासून धडा घेऊन दुसरी फाळणी रोखण्यासाठीचे मार्गदर्शन करणारे त्यांचे पुस्तक प्रसिद्ध आहे. याच पुस्तकात त्यांनी सावरकर यांचा ‘भारतीय राष्ट्रीय सुरक्षेचे पितामह’ म्हणून गौरवपूर्ण उल्लेख केला आहे.
‘सावरकर यांची राष्ट्रीय सुरक्षेची दूरदृष्टी आणि मोदी मॉडेल’ यासह अन्य विषयांवर राजकीय विश्लेषक म्हणून माहूरकर यांचा लौकिक आहे. ‘भारतातील पुरोगामी मुस्लिम संघटनांची वाटचाल’ आणि ‘साऊथ एशिया अँड डिस्टॉर्टिऑन्स इन इंडियन हिस्ट्री’ ही पुस्तके चर्चेत आहेत.

2014 साली प्रसिद्ध झालेल्या ‘सेंटरस्टेज इनसाईड द नरेंद्र मोदी मॉडेल ऑफ गव्हर्नन्स’ या नवी दिल्लीत प्रकाशित झालेल्या पुस्तकाने संपूर्ण देशाचे लक्ष त्यांनी वेधून घेतले. नरेंद्र मोदी यांच्या जीवनकार्याचा आढावा घेणारे हे पहिले पुस्तक प्रकाशित झाले.
ख्यातनाम अर्थतज्ज्ञ डॉ. जगदीश भगवती, प्रसिद्ध पत्रकार स्वपनदास गुप्ता यांनीही ‘सेंटरस्टेज’ या पुस्तकाचा गौरव केला आहे. आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री. श्री. रविशंकर तसेच ख्यातनाम अर्थतज्ज्ञ बिबेक दिब्रॉय आणि जालंदरचे महाराजा हिज हायनेस गजसिंग यांनीही या पुस्तकाचा गौरव केला आहे.

‘मार्चिंग विथ अ बिलियर’ या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या तीन वर्षांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारे पुस्तक 2017 साली राष्ट्रपती भवनात प्रकाशित करण्यात आले. तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या प्रमुख उपस्थितीत तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी त्याचे प्रकाशन केले.वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे संस्थापक व अ‍ॅन्युयल डाओस बिझनेस मिट इन स्वीत्झर्लंडचे संघटक प्रोफेसर क्लॉस श्वॉब यांनी या पुस्तकाचा विशेष उल्लेख केला आहे. फ्रान्सचे तत्कालीन अध्यक्ष फ्राँकोईस होलँडे, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना आणि इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांच्या उपस्थितीत या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

सतरा वर्षांत सर्वाधिक प्रकरणे निकालात
काढण्याचा राष्ट्रीय उच्चांक करणारे माहूरकर
उदय माहूरकर यांनी केंद्रीय आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर प्रलंबित असणारी प्रकरणे निकालात काढण्याचा राष्ट्रीय उच्चांक प्रस्थापित केला आहे. गेल्या 17 वर्षांच्या कालावधीत एका वर्षात एवढी प्रकरणे निकालात काढण्याचा हा उच्चांक आहे. 2021-22 या सालात त्यांनी 5 हजार 56 प्रकरणे निकालात काढली. यामध्ये त्यांनी दिलेले काही निर्णय हे विशेष महत्त्वाचे आहेत. यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे राष्ट्रीय हस्तलिखित आयोगाला 2 लाख 73 हजार हस्तलिखित दस्तावेज सार्वजनिक करण्याचा दिलेला आदेश गाजला आहे.

Back to top button