मुख्यमंत्र्यांच्या कामाचा विरोधकांना पोटशूळ : ना. उदय सामंत | पुढारी

मुख्यमंत्र्यांच्या कामाचा विरोधकांना पोटशूळ : ना. उदय सामंत

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
कोरोनाकाळात आणि सद्यस्थितीतही राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुटुंबप्रमुखाप्रमाणे काम करीत आहेत. त्याचाच विरोधकांना पोटशूळ झाला असल्याची बोचरी टीका राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली.

डुबेरे येथे साकारण्यात आलेले अद्ययावत प्राथमिक आरोग्य उपकेंद्र व ग्रामसचिवालय इमारतीचा लोकार्पण सोहळा मंगळवारी (दि. 17) पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. सिन्नरमध्ये शिवसेनेत तरुण पिढी सक्रिय झाली आहे, ही पक्षाच्या द़ृष्टीने महत्त्वाची बाब असल्याचेही ना. सामंत यांनी नमूद केले.

माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात व्यासपीठावर शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, युवा नेते उदय सांगळे, उपजिल्हा प्रमुख दीपक खुळे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शीतल सांगळे, पंचायत समितीच्या माजी सभापती संगीता पावसे, खरेदी-विक्री संघाच्या चेअरमन निशा वारुंगसे, तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर गाडे, शहराध्यक्ष गौरव घरटे, श्रीमंत पेशवे पतसंस्थेचे चेअरमन नारायण वाजे, माजी नगराध्यक्ष किरण डगळे, बाजार समितीचे माजी सभापती नामदेवराव शिंदे, चिंचोलीचे माजी सरपंच संजय सानप, सोनांबेचे सरपंच डॉ. रवींद्र पवार, डुबेरेचे सरपंच ज्ञानेश्वर ढोली, प्राथमिक शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष अंबादास वाजे आदी उपस्थित होते.

नारायण वाजे यांनी प्रास्ताविकात डुबेरे गावाची ऐतिहासिक, सामाजिक व सहकार क्षेत्रातील महती नमूद केली. ग्रामस्थांच्या वतीने ना. सामंत यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेना पदाधिकारी, ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

विकासकामांची भरारी कौतुकास्पद ः वाजे
डुबेरे गावात विकासकामांची भरारी कौतुकास्पद असल्याचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांनी सांगितले. झालेल्या विकासकामांच्या तुलनेत काही कामे मागे ठेवण्यात आली असली तरी ती टप्प्याटप्प्याने पूर्ण केली जात असल्याचे त्यांनी नमूद केले.

विकासाचा प्रवाह कायम ठेवू ः उदय सांगळे
डुबेरे गावात आरोग्य उपकेंद्र नावालाच होते. ते खासगी जागेत असल्यामुळे वापराविना राहिले. आपण त्याचे निर्लेखन करून आरोग्य उपकेंद्राची जिल्ह्यातील पहिली दोन मजली इमारत बांधल्याचे युवा नेते उदय सांगळे यांनी सांगितले. हा विकासाचा प्रवाह यापुढे कायम ठेवू, असा विश्वास व्यक्त केला.

हेही वाचा :

Back to top button