नाशिक : वायुसेनेच्या विमानतळावर गवताला आग | पुढारी

नाशिक : वायुसेनेच्या विमानतळावर गवताला आग

ओझर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा
संरक्षण क्षेत्राच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असलेल्या येथील भारतीय वायुसेनेच्या विमानतळाच्या धावपट्टीलगत असलेल्या गवतास शुक्रवारी सायंकाळी आग लागल्याने मोठी खळबळ उडाली. आग विझवण्यासाठी एअरफोर्स, एचएएल, नाशिक मनपाच्या अग्निशमन दलाच्या बंबांचे उशिरापर्यंत शर्थीचे प्रयत्न सुरू होते. दरम्यान, आगीचे निश्चित कारण समजू शकले नाही.

ओझर येथे भारतीय वायुसेनेचे विमानतळ असून, या विमानतळावरील धावपट्टीच्या आजूबाजूला गवताची विस्तीर्ण गायरान जागा आहे. सायंकाळी सहाच्या सुमारास अज्ञात कारणाने येथील गवताने अचानक पेट घेतला. थोड्याच वेळात या आगीने रौद्र रूप धारण केले. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने वाळलेल्या गवताने अल्पकाळातच ओझरसह मोहाडी, साकोरा भागापर्यंत ही आग पसरत गेली. उन्हाळ्याचे दिवस व सुके गवत असल्याने आग लवकर आटोक्यात येत नव्हती. उशिरापर्यंत अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करीत होते. दरम्यान, ओझर पोलिस ठाण्याशी संपर्क साधला असता पोलिस ठाण्यात या बाबतची कोणतीही माहिती उपलब्ध नव्हती.

वन्यजीव होरपळले; अनेक ससे मृत
आगीत अनेक वन्यप्राणी मुत्युमुखी पडले असून, यात सशांचे प्रमाण अधिक असल्याचे समजते. आग लागल्याचे समजताच वायुसेना व विमानतळ प्रशासनाने तत्काळ एचएएल, एअरफोर्स, नाशिक मनपा येथील अग्निशमन दलाशी संपर्क साधला. अग्निशमन दलाचे जवान उशिरापर्यंत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करीत होते.

हेही वाचा :

Back to top button