तासवडे टोलनाका : प्रवीण माळी
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील तासवडे आणि किणी टोलनाक्यास टोलवसुलीसाठी 53 दिवसाची मुदत वाढ देण्यात आली आहे. परंतु 53 दिवसानंतर टोल बंद होणार नसून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून हे दोन्ही टोलनाके राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग होणार आहेत. त्यामुळे आणखी किती वर्षे वाहन चालकांच्या मानगुटीवर टोलचे भूत बसणार आहे, असा संतप्त सवाल वाहनचालकांनी उपस्थित केला आहे.
बांधा वापरा आणि हस्तांतरित करा या बीओटी तत्त्वावर पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाच्या सातारा ते कागल या मार्गाचे 2002 ला चौपदरीकरण पूर्ण झाले. 2002 ला महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून या मार्गाची बीओटी तत्वाची निविदा काढण्यात आली होती. त्यामुळे 3 मे 2002 ते 2 मे 2 मे 2022 या वीस वर्षाच्या कालावधीत टोल वसुलीचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळ होते. त्यावेळी महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाकडून टोल वसुली करण्यासाठी ठेकेदार कंपन्या नेमण्यात आल्या होत्या. वीस वर्षाच्या कालावधीत अनेक कंपन्यांनी टोलवसुलीचा ठेका घेतला. या कालावधीत वाहनचालकांना सेवा आणि सुविधा देण्याच्या बाबतीत नेहमीच टोल वसुली कंपनी आणि महाराष्ट्र राज्य विकास मंडळाने आपला हात आखडता घेतला आहे. अनेक वेळा दोन्ही टोलनाक्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या असतात. या दोन्ही टोल नाक्यावर रिटर्न टोलची पावती देण्यात येत नाही. स्वच्छतागृहांची अवस्था अतिशय बिकट आहे. तसेच या दोन्ही टोल नाक्यावर रुग्णवाहिका आणि दुचाकीसाठी वेगळी लेन ठेवण्यात आली नाही. वीस वषार्ंपासून तीच परिस्थिती आहे. महाराष्ट्र सरकारने टोलवसुलीसाठी नेमलेल्या ठेकेदार कंपनीने वीस वर्षात वाहन चालकांकडून हजारो कोटी रुपयांचा टोल वसूल केला आहे. दरम्यान टोलमध्ये सुसूत्रता येण्यासाठी दोन वर्षांपासून संपूर्ण देशातील टोलनाक्यावर फास्टॅग यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. तासवडे आणि किणी या टोलनाक्यावरही फास्टॅग यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. परंतु या दोन्ही ठिकाणी फास्टॅग यंत्रणा व्यवस्थित चालत नाही. अनेक वेळा वाहन चालक आणि टोलकर्मचारी यांच्यात वादावादीचे प्रसंग घडत आहेत. वीस वर्षात असे अनेक प्रसंग घडले आहेत. या तक्रारी पोलिस ठाण्यात गेल्यानंतर या तक्रारीचे पुढे काय झाले हा संशोधनाचा विषय आहे. कोरोना काळात 53 दिवस टोलवसुली बंद करण्यात आला होती. त्या 53 दिवसाची टोल वसुली व्हावी यासाठी रस्ते विकास महामंडळाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे 53 दिवस वाढवून मिळावे यासाठी पाठपुरावा केला होता. त्यानुसार टोलवसुलीस मुदतवाढ देण्यात आली आहे. 25 जून पासून तासवडे आणि किणी हे दोन्ही टोलनाके राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे जाणार आहेत.
सातारा जिल्ह्यातील तासवडे व कोल्हापूर जिल्ह्यातील किणी या दोन्ही टोलनाक्यामधील अतंर 48 किलोमीटर आहे. दरम्यान तीन महिन्यापूर्वी रस्ते विकास मंत्री नितिन गडकरी यांनी संसदेत सांगितले होते की, देशातील महामार्गावर 60 किलोमीटरच्या अंतरात एकच टोलनाका राहील. त्यामुळे या दोन्ही टोलनाक्यामधील अंतर 60 की.मी.पेक्षा कमी आहे.त्यामुळे तासवडे टोल नाका बंद करावा अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.