नाशिक : आंतरराष्ट्रीय मेडिकल टुरिझम समितीची स्थापना; ‘मी नाशिककर’चा पुढाकार | पुढारी

नाशिक : आंतरराष्ट्रीय मेडिकल टुरिझम समितीची स्थापना; ‘मी नाशिककर’चा पुढाकार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : नाशिकमध्ये अनेक मोठे हॉस्पिटल्स कार्यरत असून, नाशिक आरोग्य सेवा सुविधेमध्ये जागतिक दर्जाशी तुलना करीत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे अन्य शहरांच्या तुलनेत येथील उपचार खर्चही परवडणार्‍या दरात आहे. तसेच नाशिकमध्ये निसर्गोपचार व योगा केंद्रेदेखील आहेत. त्यामुळे नाशिकमध्ये देश-विदेशातील नागरिकांनी येऊन उपचार घ्यावेत, याकरिता ‘मी नाशिककर’तर्फे मेडिकल आणि वेलनेस टुरिझम या संकल्पनेवर आधारित समितीची स्थापना करण्यात आली आहे.

कर्करोगतज्ज्ञ डॉ. राज नगरकर यांच्या पुढाकाराने याबाबतचे काम सुरू करण्यात आले असून, हृदयरोगतज्ज्ञ डॉ. विनोद विजन हे मार्गदर्शकाच्या भूमिकेत आहेत. या समितीची पहिली बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीसाठी दिल्लीहून केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील विशेष अधिकारी डॉ. ओमप्रकाश शेटे उपस्थित होते. ‘मी नाशिककर’चे समन्वयक संजय कोठेकर यांनी बैठकीचे नियोजन केले होते. दरम्यान, याप्रसंगी डॉ. राज नगरकर, डॉ. विनोद विजन यांच्यासह केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील विशेष अधिकारी डॉ. ओमप्रकाश शेटे, तानचे मनोज वासवानी, आयजीबीसीचे किरण चव्हाण, क्रेडाईचे उमेश वानखेडे, उद्योजक मनीष रावल, संजय कोटेकर, पीयूष सोमाणी उपस्थित होते.

अशी असेल समितीची भूमिका : कर्करोग, हृदयरोग, डोळ्यांचे उपचार, सांधेरोपण या उपचारांवर इंडियन मेडिकल असोसिएशनसोबत समिती स्थापन करून पहिल्या टप्प्यात लक्ष केंद्रित करणार. त्यानंतर अन्य व्याधींसाठी प्रयत्न केले जाणार. इको वेलनेस टुरिझमसाठी विशेष प्रयत्न. त्यासाठी त्र्यंबक रस्त्यावर आंतरराष्ट्रीय योगा विद्यापीठासाठी प्रस्ताव सादर करणार. नाशिक मेडिकल टुरिझमसाठी पोर्टल तयार करणार. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सहकार्याने सुदान, नायजेरिया, टान्झानिया, केनिया, अफगाणिस्तान, बांगलादेश, मालदीव, इराक, ओमान, येमेन या देशांच्या दूतावासांतील अधिकार्‍यांसमोर सादरीकरण करणार. परवडणार्‍या सर्व्हिस अपार्टमेंटची निर्मिती अशा अनेक उपाययोजना करणार आहेत.

हेही वाचा :

Back to top button