सांगलीत हॉटेलवर दगडफेक | पुढारी

सांगलीत हॉटेलवर दगडफेक

सांगली ः पुढारी वृत्तसेवा विश्रामबाग येथील हॉटेल ‘अजवा’वर बुधवारी रात्री पाचजणांच्या टोळक्याने दगडफेक केली. फ्रीजसह अन्य साहित्यांची मोडतोड केली. टोळक्याचा धिंगाणा हॉटेलमधील ‘सीसीटीव्ही’ कॅमेरात कैद झाला आहे. पाचजणांचे टोळके रात्री दहा वाजता हॉटेलमध्ये ‘शोरमा’ खाण्यास गेले होते. ते दारूच्या नशेत होते. त्यांनी फुकट शोरमा खाण्यास मागितला.

हॉटेल मालक महम्मद सादीक शब्बीरअली देवजानी यांनी ‘फुकट काही मिळणार नाही’, असे सांगितले. यावरून टोळक्याने त्यांच्याशी वाद घातला. त्यानंतर त्यांनी पैसे देऊन शोरमा घेतला. खाऊन ते निघूनही गेले. पुन्हा रात्री साडेदहा वाजता ते आले. त्यांनी थेट हॉटेलवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. हॉटेलबाहेर फ्रीज होता. त्याची तोडफोड केली. हॉटेलच्या काचा फोडल्या.

यामध्ये पन्नास हजारांचे नुकसान झाले आहे. या घटनेनंतर देवजानी यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्याशी संपर्क साधून माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेर्‍याचे फुटेज तपासले. यात हल्ला करणारे पाच संशयित दिसत आहेत. पोलिसांनी फुटेज ताब्यात घेतले आहे. त्याआधारे संशयितांची नावे निष्पन्न करण्याचे काम सुरू आहे. येत्या एक-दोन दिवसात त्यांना अटक करण्यात यश येईल, असे सहाय्यक पोलिस निरीक्षक अमितकुमार पाटील यांनी सांगितले.

हेही वाचलतं का?

Back to top button