नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यात एकीकडे लोकसभा निवडणुकांमुळे राजकीय वातावरण तापू लागले असताना तळपत्या उन्हामुळे ग्रामीण भागात पाण्याचे दुर्भीक्ष निर्माण झाले आहे. त्यामुळे पाणी टँकर्सच्या मागणीत वाढ होत आहे. सद्यस्थितीत एक हजार ५३ गावे-वाड्यांना ३२६ टॅंकर्सद्वारे पाणी पुरविले जात आहे. याद्वारे पाच लाख ७७ हजार १६६ लोकसंख्येची तहान भागविण्यात येत आहे.
चालू वर्षी जिल्ह्यात उन्हाचा तडाखा अधिक जाणवत आहे. मे महिन्याच्या प्रारंभीच तापमानाच्या पाऱ्याने ४१ अंशांपर्यंत मजल मारली. आधीच दुष्काळी स्थिती त्यात वाढत्या उष्म्याने जलस्त्रोत आटून तीव्र पाणीटंचाईने डोके वर काढले आहे. ग्रामीण भागात उष्णता आणि पाणीबाणीने होरपळून निघत आहे. पाण्यासाठी हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. ग्रामस्थांना पाणी टँकरवरच अवलंबून राहावे लागते आहे.
जिल्ह्यात दिंडोरी, निफाड व कळवण हे तीन तालुकेवगळता उर्वरित सर्वच तालुक्यांमध्ये पाणी टँकरचा फेरा सुरू आहे. नांदगाव व येवला या दोन तालुक्यांमध्ये भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. हंडाभर पाण्यासाठी महिलांच्या नशिबी भटकंती ओढावली आहे. नांदगाव तालुक्यात ६२ गावे आणि २७६ वाड्या अशा एकूण ३४० ठिकाणी ६९ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. तर येवल्यात ५७ गावे आणि ५९ वाड्या अशा ११६ ठिकाणी ५४ टँकरद्वारे पाणी पुरविले जात आहे. अन्य तालुक्यांची स्थिती यापेक्षा वेगळी नाही. पाण्याचे दुर्भीक्ष बघता प्रशासनाने टँकर्सच्या दररोज ६८७ फेऱ्या मंजूर केल्या आहेत. पण प्रत्यक्षात ७१० फेऱ्या होत आहेत. याशिवाय पाणीपुरवठ्यासाठी प्रशासनाने १६९ विहिरीदेखील अधिग्रहित केल्या आहेत.
टॅंकर्स ३७५ वर?
प्रशासनाने टंचाई कृती आराखडा तयार करताना त्यात ३७५ पर्यंत टँकर्सची संख्या पोहोचेल, असा अंदाज बांधला होता. त्यादृष्टीने नियोजन करण्यात आले. दरम्यान, मान्सूनसाठी अद्यापही महिनाभराचा कालावधी शिल्लक आहे. याकाळात उष्णता लाटेचा जोर बघता ३७५ च्या वर टँकर्सची संख्या पोहोचण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
जिल्ह्यातील टँकरची स्थिती
तालुका- गावे/वाड्या टँकर संख्या
बागलाण ३६ ३५
चांदवड ९३ ३१
देवळा ६२ ३२
इगतपुरी १ १
मालेगाव १२७ ४६
नांदगाव ३४० ६९
नाशिक १ १
पेठ १६ ८
सुरगाणा २८ १४
सिन्नर २१७ ३४
त्र्यंबकेश्वर १ १
येवला ११६ ५४
एकूण १०५३ ३२६
हेही वाचा: