स्वतःचे खास वातावरण असलेल्या बाह्यग्रहाचा शोध | पुढारी

स्वतःचे खास वातावरण असलेल्या बाह्यग्रहाचा शोध

वॉशिंग्टन : एखाद्या ग्रहावर जीवसृष्टी असण्यासाठी तीन गोष्टी आवश्यक असतात. पहिले म्हणजे, त्या ग्रहाचा पृष्ठभाग कठीण, खडकाळ असावा व तो गुरू, शनीसारखा निव्वळ वायूचा गोळा नसावा. दुसरे म्हणजे त्या ग्रहावर पाण्याचे अस्तित्व असावे. तिसरे म्हणजे या ग्रहाचे आपल्या तार्‍यापासूनचे अंतर योग्य असावे, जेणेकरून त्यावरील तापमान राहण्यास योग्य ठरेल. या तीन मूलभूत निकषांशिवाय अन्यही एक निकष महत्त्वाचा आहे व तो म्हणजे संबंधित ग्रहाला स्वतःचे खास वातावरणही असावे. आता जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपने असे वातावरण असलेल्या एका बाह्यग्रहाचा शोध लावला आहे.

या ग्रहाला ‘55 कॅनक्री ई’ असे नाव देण्यात आले आहे. हा बाह्यग्रह म्हणजेच आपल्या सौरमालिकेच्या बाहेर असलेला ग्रह पृथ्वीपासून 41 प्रकाशवर्ष अंतरावर आहे. ‘जेम्स वेब’ने या ग्रहाच्या वातावरणाचा छडा लावला आहे. या ग्रहाचा आकार पृथ्वीपेक्षा दुप्पट मोठा आहेे; मात्र त्याचे घनत्व थोडे कमी आहे. हा ग्रह अशा पाच ज्ञात ग्रहांपैकी एक आहे, जो कर्क तारामंडळात सूर्यासारख्या एका तार्‍याभोवती प्रदक्षिणा घालतो. ‘नेचर’ या नियतकालिकात याबाबतच्या संशोधनाची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार ‘55 कॅनक्री ई’ या ग्रहाच्या वातावरणात कार्बन डायऑक्साईड आणि कार्बन मोनॉक्साईड यांचा जाड स्तर आहे.

वातावरणात कोणत्या वायूचे किती प्रमाण आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पृथ्वीचे वातावरण हे नायट्रोजन, ऑक्सिजन व अन्य काही वायूंनी बनलेले आहे. खगोलशास्त्रज्ञांनी आता ‘55 कॅनक्री ई’ ला ‘सुपरअर्थ’च्या कॅटॅगरीमध्ये ठेवले आहे. याचा अर्थ तो पृथ्वीपेक्षा आकाराने मोठा आहे; पण नेपच्यूनपेक्षा छोटा आहे. या ग्रहाची रचना आपल्या सौरमालिकेतील ग्रहांसारखीच आहे. मात्र, तेथील तापमान अत्याधिक असून, ते 2300 अंश सेल्सिअसपर्यंत जाऊ शकते. याचा स्पष्ट अर्थ असा होतो, की या ग्रहावर जीवसृष्टीची शक्यता नाही. मात्र, वातावरण असलेले बाह्यग्रह अंतराळाच्या या अफाट पसार्‍यात आहेत, हेच हा ग्रह सुचवतो!

Back to top button