Sakri : पाणी टंचाईच्या झळा ; संतप्त महिलांचा पंचायत समितीवर हंडा मोर्चा | पुढारी

Sakri : पाणी टंचाईच्या झळा ; संतप्त महिलांचा पंचायत समितीवर हंडा मोर्चा

धुळे (पिंपळनेर) : पुढारी वृत्तसेवा ; धुळे जिल्ह्यातील साक्री (Sakri) तालुक्यात असलेल्या सुतारे ग्रामपंचायत अंतर्गत असेलेल्या गाव, पाडे, आनंद्याचापाडा येथील महिलांनी पाणीटंचाई विरोधात साक्री पंचायत समिती कार्यालयावर हंडा मोर्चा नेला. यावेळी पंचायत समितीच्या सभापती प्रतिभा सूर्यवंशी यांना भेटून महिलांनी पाणी टंचाईच्या समस्येचा पाढा वाचला.

यावेळी सभापती सूर्यवंशी यांनी गावातील महिलांकडून निवेदन स्विकारले. सुतारे ग्रामपंचायत अंतर्गत गाव, पाडयात पिण्याच्या पाण्याची प्रचंड टंचाई निर्माण झाली असून दिवसेंदिवस उन्हाच्या झळा, रात्री उष्णतेचा उकाडा वाढला आहे. सुतारे ग्रामपंचायत अंतर्गत कार्यरत असलेले ग्रामसेवक बि. टी. पवार यांच्याकडे पाणीटंचाईची समस्या सोडवण्यासाठी अनेकवेळा पाठपुरावा केला असून त्यांनी गावातील कोणत्याही प्रकारची समस्या सोडवली नसल्याने महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी भर उन्हात व अपरात्री पायपीट करावी लागत आहे. एका खाजगी शेतक-याच्या शेतातून पाणी आणावे लागत आहे. अशी तक्रार यावेळी महिलांनी निवेदनाद्वारे केली. (Sakri)

३५ ते ४० वर्षाची जुनी विहिर
सार्वजनिक पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीतील गाळ काढून विहिरीचे खोलीकरण करण्यासह आडवे बोअरवेल केल्यास  ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गांव पाड्यावर आलेली भीषण पाणीटंचाई यामुळे दुर होवू शकते. अशी मागणी यावेळी महिलांनी केली. सभापती प्रतिभा सूर्यवंशी यांची भेट घेऊन समस्या मांडली. तसेच निवेदन देत पाणी टंचाईची समस्या सोडविण्याची मागणी केली.

ग्रामसेवक पवार यांच्या बदलीची मागणी 
ग्रां. पं. सुतारे येथे ग्रामसेवक बी. टी. पवार हे गेल्या दहा वर्षांंपासून एकाच ठिकाणी कार्यरत आहेत. ग्रामसेवक भेटीचे दिवस म्हणून ग्रा. पं. फलकावर मंगळवार, बुधवार, शुक्रवार असे लिहिले असले तरी ते नियमित येत नाही. कधीतरी पंचायतीत आलेच तर केवळ दहा ते पंधरा मिनिटे थांबतात. ते सहा-सहा महिने ग्रामपंचायतीत हजर राहत नाही अशी तक्रार निवेदनातून महिलांनी केली आहे.

गांव, पाडे, यांच्या विकास कामांसाठी आलेल्या निधीचा वापर किती झाला व किती शिल्लक आहे, याची व  ग्रामसेवक बी. टी. पवार यांची सखोल चौकशी करून इतरत्र बदली करण्यात यावी अशी मागणी महिलांनी केली. यावेळी भिकीबाई जगताप, इंदुबाई गांगुर्डे, ताईबाई बागुल, झुबाबाई बहिरम, सिताबाई पवार, शालिग्राम जगताप, संदिप गावीत, काळू महाले, मिलाबाई महाले, जिभाऊ बागुल, राजु जगताप, देविदास पवार, निलेश गांगुर्डे, आण्णा बहिरम आदींनी निवेदन दिले.

हेही वाचा :

Back to top button