नाशिक : पासपोर्टसाठी ‘एफआरओ’ ठरतेय प्रभावी ; ‘हा’ होतोय फायदा | पुढारी

नाशिक : पासपोर्टसाठी ‘एफआरओ’ ठरतेय प्रभावी ; 'हा' होतोय फायदा

नाशिक : मुस्कान शेख
गेल्या दोन वर्षांत कोरोना प्रादुर्भावामुळे विदेश दौर्‍यांना लागलेला ब्रेक आता कोरोना कमी झाल्याने सुटला आहे. पासपोर्ट कार्यालयात नवीन पासपोर्ट तसेच नूतनीकरणासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसत आहे. विशेष म्हणजे पासपोर्ट काढण्यासाठी नागरिकांना किचकट आणि त्रासदायक वाटणारी प्रक्रिया ‘एफआरओ’ (परकीय नागरिक नोंदणी) या प्रणालीमुळे अधिक सोपी झाली आहे. या शिवाय पोलिस व्हेरिफिकेशनसाठी करावी लागणारी दीर्घ प्रतीक्षा टळत आहे.

भारतातून परदेशात शिक्षण, नोकरी, व्यवसायाबरोबरच पर्यटनासाठी जाणार्‍यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. दरवर्षी देशातून लाखो नागरिक विविध कारणांसाठी वेगवेगळ्या देशांत जातात. मात्र, गेल्या दोन वर्षांत कोरोना प्रादुर्भावामुळे परदेशात असलेले बहुतेक जण मायदेशी परतले आहेत, तर नवीन जाणार्‍यांचे बेत काही काळापुरते स्थगित झाले होते. मात्र, आता कोरोना कमी झाल्याने पासपोर्ट कार्यालयात गर्दी वाढली आहे. विशेष म्हणजे पासपोर्ट कार्यालयाकडून सुरू करण्यात आलेली एफआरओ (परकीय नागरिक नोंदणी प्रणाली) या ऑनलाइन सिस्टीममुळे पासपोर्ट सुविधा अधिक सोपी झाली आहे. यात पासपोर्टसाठी ऑनलाइन अर्ज केल्यानंतर पासपोर्ट कार्यालयाकडून कागदपत्रे तपासणीसाठी विशिष्ट वेळ दिला जातो. त्यानंतर त्या वेळेतच नागरिकांना त्या कार्यालयात जाऊन कागदपत्रे तपासणी करून अ‍ॅप्रूव्ह दिले जाते. त्यानंतर हा अर्ज ऑनलाइन पद्धतीनेच थेट त्या-त्या पोलिस ठाण्याकडे जातो.

तिथे संबंधित पोलिस ठाण्यातील कर्मचारी हे त्या नागरिकावर कुठला गुन्हा दाखल आहे का तसेच अन्य पडताळणी करून त्या व्यक्तीची माहिती ऑनलाइन पद्धतीनेच भरली जाते. तसेच पोलिस निरीक्षकाच्या स्वाक्षरीने फॉर्म क्लीअर करून, पुढे पासपार्ट कार्यालयाकडे पाठविला जातो. त्यानंतर पासपोर्टची प्रक्रिया पूर्ण होऊन अत्यंत कमी वेळेत पासपोर्ट मिळण्यास मदत होत आहे. या प्रणालीमुळे नागरिकांना पासपोर्ट काढताना होणारी धावपळ, कमी झाली आहे.

पीआरओ प्रणालीद्वारे सर्व पोलिस ठाणे जोडण्यात आल्याने पोलिसांना संबंधित व्यक्तीची माहिती त्या प्रणालीमध्ये भरावी लागते. नागरिकांची पोलिस दप्तरी असलेल्या नोंदींची तपासणी करून क्लीअरचा शेरा असलेला फॉर्म पोलिस ठाण्याकडून आयुक्त कार्यालयाकडे पाठवला जातो. तिथून तो पासपोर्ट कार्यालयाकडे जातो. या प्रणालीमुळे नागरिकांचा वेळ वाचतो. पोलिसांचे कामदेखील अधिक सुटसुटीत झाले आहेे.
– राम जाधव, सहायक पोलिस उपनिरीक्षक, इंदिरानगर, पोलिस ठाणे

हेही वाचा :

Back to top button